स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना सुरू करणार – महापौर रवि लांडगे यांची घोषणा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १४ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “शहरातील वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान पाहता पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना’ लवकरच सुरू करण्यात येईल. ही योजना महापालिका आणि नागरिकांच्या सक्रिय लोकसहभागातून यशस्वी केली जाईल,” अशी घोषणा महापौर रवि लांडगे यांनी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शहरातील हरित क्षेत्र वाढविणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव, सेक्टर २६ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे एका विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महापौर रवि लांडगे पुढे म्हणाले की, “प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासाठी महापालिका नागरिकांना रोपे, खत तसेच आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. शहरात पुढील काळात तब्बल २ लाख वृक्षारोपण करण्याचा आमचा मानस असून, त्यासाठी विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल.”
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या नियोजित प्रकल्पांची माहिती दिली. “महापालिकेच्या राखीव भूखंडांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. शहरातील निवडक ठिकाणी ‘डेन्स फॉरेस्ट’ (घणदाट जंगले) विकसित करण्याची संकल्पना राबविण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ तर उन्हाळ्यातील तापमानात घट होईल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीला व वृक्षारोपण कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. नामदेव जाधव, निलेश शिंदे, सूर्यकांत मुथियान, विजय नाईक यांसह निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरमचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


