छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ मे २०२६ मॅक्स मंथन दिली न्यूज:
पिंपरी: “छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे साक्षात प्रतीक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले अभूतपूर्व बलिदान हे आजच्या युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. संभाजी महाराजांच्या विचारांमधून आपल्याला राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि अन्यायाविरोधात लढण्याची ताकद मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या महान कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
जयंती दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पाषाण शिल्पास महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिवार मुजरा करण्यात आला.
या गरिमामयी सोहळ्याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ नखाते, आबासाहेब ढवळे, वैभव जाधव, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर, जितेंद्र छाबडा, संजय कुरबट्टी, हेमा पारिसकर, हेमलता वाडेकर यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने महापालिका भवन आणि बर्ड व्हॅली परिसर दुमदुमून गेला होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


