पवना धरण वाचवा! मुरूम माफियांवर मकोका (MCOCA) लावा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १४ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: मावळ तालुक्यातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रात्रीच्या अंधारात ५० पेक्षा अधिक हायवा डंपरद्वारे अवैध मुरूम आणि मातीचे उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
“पवना धरणाच्या काठावरून जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून २० ते ३० फूट खोल खड्डे खणून मुरूम चोरला जात आहे. विना नंबर प्लेटचे हे हायवा ट्रक गेव्हाण खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे, शिवली मार्गे चांदखेडकडे जातात. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही,” असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला आहे.
बेकायदेशीर उत्खननामुळे धरणाची साठवण क्षमता घटत असून भिंतीलाही धोका निर्माण झाला आहे. परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने स्थानिक शेतकरी देशोधडीला लागला आहे. मुरूम माफियांनी १९६६ चा महसूल कायदा आणि १९८६ चा पर्यावरण कायदा पूर्णपणे पायदळी तुडवला आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उत्खननामुळे नापीक बनवल्या जात आहेत.
१. मुख्यमंत्र्यांनी विशेष भरारी पथक नेमून धरण परिसरात २४x७ गस्त सुरू करावी.
२. मुरूम माफिया आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
३. पवना धरण परिसरापासून ५ किलोमीटरचा परिसर तातडीने “No Mining Zone” घोषित करावा.
४. संपूर्ण परिसराचा ड्रोन सर्व्हे करून दोषींवर कडक दंडात्मक वसुली करावी.
५. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाचा ७ दिवसांत अहवाल मागवावा.
६. उत्खननात वापरले जाणारे सर्व हायवा आणि डंपर जप्त करून ही अवैध वाहतूक थांबवावी.
“मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पवना धरण वाचवा. जर पुढील ७ दिवसांत या मुरूम माफियांवर कडक कारवाई झाली नाही, तर शिवशाही व्यापारी संघ आणि स्थानिक शेतकरी मिळून मंत्रालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करतील. मुरूम माफियांना मावळातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
– युवराज दाखले, संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


