news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड हादरले! आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची मोशीत हत्या

पिंपरी-चिंचवड हादरले! आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची मोशीत हत्या

'युवराज बार'मध्ये दोन अज्ञात हल्खोरांचे सपासप वार; आरोपींच्या शोधासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांची पथके रवाना | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआय (आठवले) गटाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची निर्घृण हत्या

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मारुती मोरे (वय ४६, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) यांची पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोशी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बुधवारी रात्री हा प्रकार घडला. गंभीर जखमी झालेल्या मोरे यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अनिल मोरे हे पक्षाच्या कामासोबतच रिअल इस्टेटच्या व्यवसायात कार्यरत होते. याप्रकरणी मोरे यांचे चालक नागनाथ पुंडलिक चाटे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी चालक चाटे हे सुट्टीवर असल्याने अनिल मोरे स्वतः आपली एसयूव्ही (SUV) गाडी चालवत मोशी येथील ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’ येथे गेले होते. रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये दोन अज्ञात हल्खोरांनी मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. “या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा असा संशय असून हल्खोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत,” अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली. पोलीस सध्या हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून आरोपींचा सुगावा लावत आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते असलेल्या अनिल मोरे यांच्या हत्येचे वृत्त समजताच मावळ आणि खेड तालुक्यासह पिंपरी चिंचवडमधील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!