पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले. महापौरांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानापासून ते महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत थेट सायकलने प्रवास केला. या माध्यमातून त्यांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा मोलाचा संदेश दिला.
आज सकाळी महापौर रवि लांडगे हे निवासस्थानातून सायकलवरून महापालिकेकडे रवाना झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत असताना त्यांच्यासोबत महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दीक्षित, महापौरांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले आणि संदीप पालांडे हे देखील सायकलवरून सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशातून प्रेरणा घेत आजचा हा सायकल प्रवास करण्यात आला आहे. मी स्वतः येथून पुढे आठवड्यातून एक दिवस सायकलनेच प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दैनंदिन जीवनात शक्य तिथे सायकलचा वापर करावा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.”
महापौरांनी पुढे नमूद केले की, सायकलचा वापर हा केवळ इंधन बचतीसाठी मर्यादित नसून, निरोगी जीवनशैली, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इंधन बचत हीच खरी राष्ट्रसेवा असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येकाने छोट्या-छोट्या सवयींमधून योगदान देण्याची गरज आहे. महानगरपालिका हरित उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून नागरिकांनीही या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

