पिंपरी-चिंचवडच्या विकासाला महावेग! स्थायी समितीत कोट्यवधींच्या ऐतिहासिक विकासकामांना मंजुरी; भव्य ‘संविधान भवन’ आणि ‘विपश्यना केंद्र’ उभारणार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ११ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या विकासाला अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या विविध जनकल्याणकारी आणि पायाभूत विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, शिक्षण, स्वच्छता, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते देखभाल व दुरुस्ती, तसेच सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांना स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.
या महत्त्वपूर्ण आढावा आणि निर्णय सभेला स्थायी समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात भव्य ‘संविधान भवन व विपश्यना केंद्र’ उभारण्याच्या (टप्पा क्र. १) कामास मंजुरी देण्यात आली आहे. संविधानातील लोकशाही, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे नागरिकांमध्ये जतन आणि प्रभावी प्रसार करण्यासाठी हे संविधान भवन अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. तसेच मनःशांती आणि तणावमुक्तीसाठी विपश्यना केंद्र शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
शहरातील गरीब व गरजू रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले:
- वायसीएम रुग्णालय: ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयाकडील पाणीपुरवठा पंप चालविण्यासाठी आणि इमारतीमधील संपूर्ण विद्युत व्यवस्थेची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचाऱ्यांची तत्पर नेमणूक केली जाणार आहे. तसेच रुग्णालयात आवश्यकतेनुसार विविध पदे पुढील ६ महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर भरण्यास मान्यता देण्यात आली.
- भोसरी व यमुनानगर रुग्णालय: नवीन भोसरी रुग्णालय व यमुनानगर रुग्णालयाच्या इमारतीतील अंतर्गत व बाह्य परिसर, रस्ते, पार्किंग, डक्ट व ड्रेनेज लाईनच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी निविदा मंजूर करण्यात आली.
- थेरगाव रुग्णालय व्हेंटिलेटर करार: नवीन थेरगाव रुग्णालयातील कोव्हिड-१९ च्या आपत्कालीन काळात ‘सीएसआर’ (CSR) निधीतून प्राप्त झालेले ९ व्हेंटिलेटर व ३ मोबाईल एक्स-रे मशीनच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कराराला मंजुरी देण्यात आली. याशिवाय वैद्यकीय विभागाकडील इतर १७ व्हेंटिलेटर्सची सीएमसी (CMC) करण्यास मान्यता मिळाली.
शहरातील सर्व घटकांना समान सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात असलेल्या मुस्लिम समाजाच्या ३, ख्रिश्चन समाजाच्या १ आणि लिंगायत समाजाच्या १ अशा एकूण ५ दफनभूमी परिसरांची २४ तास उत्तम देखभाल, सुरक्षा, स्वच्छता आणि आवश्यक प्रशासकीय कामे करण्यासाठी हक्काच्या काळजीवाहकांची (Caretakers) नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी जलनिस्सारण वाहिन्यांच्या दुरुस्तीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. थेरगाव, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधी नगर आणि शांतीनगर या झोपडपट्टी भागांतील जलनिस्सारण नलिकांची (Drainage Lines) तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. प्रभाग क्र. १ मधील चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती, शेलार वस्ती, रामदास नगर, पाटीलनगर तसेच प्रभाग क्र. १२ मधील रूपीनगर, गणेशनगर, तळवडे आणि इतर उपनगरांमध्ये नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. प्रभाग क्र. २० संत तुकाराम नगर, प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर व रहाटणी, तसेच प्रभाग क्र. ३२ मधील जुनी सांगवी येथील मुळानगर परिसरात जुनी ड्रेनेज व्यवस्था बदलून नवीन नलिका टाकण्याच्या कामांना मान्यता दिली. ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी प्रभाग १, ११, १२, १३, पिंपरी आणि रहाटणी परिसरात ‘हॉटमिक्स’ पद्धतीने डांबरीकरण करून रस्ते चकाचक केले जाणार आहेत.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी निधी मंजूर करण्यात आला. नाशिक फाटा ते मोशी (NH-60) महामार्गावरील मनपा हद्दीतील रस्त्यांची विशेष डागडुजी करण्यात येईल. एमडीआर-३१ रस्त्यावरील केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन आणि भक्तीशक्ती चौक ते मुकाई चौक या बीआरटीएस मार्गावरील किरकोळ स्थापत्य कामांची दुरुस्ती केली जाईल. रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणाकडे जाणाऱ्या १८ मीटर डीपी रस्त्यावरील सबवेच्या स्थापत्य कामांना मान्यता मिळाली आहे.बीआरटीएस कॉरिडॉर क्र. १ मधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची साफसफाई, पुणे-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरील लोखंडी रेलिंग आणि रोड फर्निचरचे आकर्षक पेंटिंग करण्यात येणार आहे.
तळवडे येथील प्रसिद्ध बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी २८६ किलोवॅट क्षमतेचा नवीन उच्चदाब वीजपुरवठा घेण्यास मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या बालवाडीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शिक्षणांतर्गत मोफत लेखन साहित्य खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत प्रभाग क्र. ३० दापोडी येथे अद्ययावत ‘शून्य कचरा’ (Zero Garbage Project) प्रकल्प चालविण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच ‘महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ यशस्वी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे, नागरिकांच्या दैनंदिन आणि मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणारे तसेच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला बळकटी देणारे विविध महत्त्वपूर्ण विषय आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले आहेत. शहरातील ‘संविधान भवन व विपश्यना केंद्र’ उभारण्याचा आमचा निर्णय हा शहराच्या वैचारिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. यासोबतच जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार व जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती सदैव कटिबद्ध असून आज मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची अत्यंत प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी केली जाईल. — अभिषेक बारणे (स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


