चांदणी चौकात गुन्हे शाखेचा थरारक सापळा! बावधनमधून ३ गावठी पिस्तुले अन् २ काडतुसांसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध हत्यारे आणि बेकायदेशीर अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक वचक निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर संपूर्ण आयुक्तालयात विशेष ‘आर्म ड्राईव्ह’ (अवैध शस्त्र विरोधी मोहीम) राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या विशेष पथकाने बावधन परिसरातील चांदणी चौकात थरारक सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून ३ बेकायदेशीर गावठी पिस्तुले (Pistols) आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत केली असून, या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बावधन व चांदणी चौक परिसरामध्ये गस्त घालत होते. यादरम्यान, गुन्हे शाखेचे कार्यक्षम पोलीस अंमलदार रवी पवार यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची व गुप्त माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार बावधन जवळील चांदणी चौक परिसरात येणार असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्रे आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने तात्काळ चांदणी चौक परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी वेढा घालून शिताफीने ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीर ३ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली.
पोलीस कारवाईत जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) आर्णव (आर्यन) प्रकाश जाधव (वय २० वर्षे, रा. शिंदे यांची खोली, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, क्षत्रियनगर, बावधन, पुणे) २) ओमकार सचिन मोरे (वय २३ वर्षे, रा. हेमराज मित्र मंडळाजवळ, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) या दोन्ही आरोपींविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गु.र.नंबर २६६/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अधिकारी करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ओमकार सचिन मोरे हा पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील अत्यंत धोकादायक आणि सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चंदननगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ०३/२०२५): भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४८३, १११, ६१(बी), आर्म्स ॲक्ट ३(२५) आणि म.पो.का ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद. सिंहगड रोड पोलीस ठाणे (गु.र.नं. २०२/२०२२): भारतीय दंड विधान (IPC) कलम ३६३, ३२५, ३२४, ३२३, १४३, १४४, १४७, १४९, ५०४ (मारहाण, दंगल व धमकावणे) अंतर्गत गुन्हा नोंद. कोथरूड पोलीस ठाणे (गु.र.नं. ११२/२०२५): आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) आणि म.पो.का ३७(१) सह १३५ अन्वये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद.
अवैध हत्यार तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करणारी ही धडाकेबाज कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) मा. श्री. रोहिदास पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) मा. श्री. डॉ. विशाल हिरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही चमकदार कामगिरी केली. कारवाईत सहभागी असलेले पोलीस पथक: पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दळे, नितीन ढोरे, पोलीस अंमलदार तुषार शेटे, विक्रम कुदळ, कुणाल शिंदे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, अली शेख, दीपक शिरसाट, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, रवी पवार, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, आणि धनंजय जाधव यांनी या मोहिमेमध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

