आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवडचा विभागनिहाय सर्वंकष आराखडा तयार करणार; नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. शहराची भौगोलिक रचना, नैसर्गिक नाले, पर्जन्यमान तसेच वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक विभागाचा स्वतंत्र व सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच शहरातील नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडविणारे अतिक्रमण किंवा अडथळे आढळल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेली पूरस्थिती आणि विविध भागांत पाणी साचण्याच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वाच्या बैठकीस आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रम बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंते मनोज सेठिया, अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकत्याच उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी अहोरात्र मैदानावर उतरून कार्यरत राहिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
ते म्हणाले,
“अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतून आणि संकटकालीन परिस्थितीतून प्रशासनाला काही महत्त्वाचे धडे मिळतात. या अनुभवांच्या आधारे भविष्यातील नियोजन अधिक सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीतील उणिवा आणि त्रुटी तातडीने दूर करून परस्परांशी उत्तम समन्वय राखून काम करावे.”
या विशेष बैठकीत महापालिकेकडे उपलब्ध असलेली आपत्कालीन साधनसामग्री, मनुष्यबळाचा समन्वय, क्षेत्रनिहाय (झोनल) प्रतिसाद व्यवस्था आणि पूरनियंत्रणासाठी करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किंवा अतिक्रमणांमुळे बाधित झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे बैठकीत निदर्शनास आले. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. शहरातील सर्व नाल्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, त्यातील सर्व अतिक्रमणे तातडीने भुईसपाट करण्याचे निर्देश दिले. तसेच एमआयडीसी (MIDC) परिसरातील नाल्यांचा प्रवाह पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
