पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शरद पवार’ राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त; महापालिका निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवानंतर पक्षाचे मोठे पाऊल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दारूण पराभव पदरी पडल्यानंतर आणि एकही नगरसेवक निवडून न आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अत्यंत मोठा आणि तडकाफडकी निर्णय घेतला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीतील अपयश हे या कारवाईमागील मुख्य कारण असले, तरी पक्षाला आलेली मरगळ दूर करून संघटनात्मक पातळीवर नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पुण्यात एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीतच पिंपरी-चिंचवडची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला माजी शहराध्यक्ष तुषार कामठे व सरचिटणीस जयंत शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
सध्या शहर कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांची शहराचे ‘प्रभारी’ म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. “पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंतांना सोबत घेऊन नवी आणि आक्रमक कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल,” अशी माहिती सुनील माने यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटाला आव्हान देण्यासाठी पिंपरी चौकातील त्यांच्या मुख्य कार्यालयाजवळच एक मोठे आणि आलिशान मध्यवर्ती कार्यालय थाटामाटात सुरू केले होते. त्यापूर्वी पक्षातील गटबाजीमुळे काळेवाडीत सुरू केलेले कार्यालय बंद करावे लागले होते.
परंतु, महापालिका निवडणुकीत पक्षाला एकही जागा न जिंकता आल्याने आणि खातेही न उघडल्याने पक्षाला मोठी गळती लागली. निवडणुकीतील पराभवानंतर पिंपरीतील हे मोठे कार्यालयही बंद करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. प्रशासनाकडून जरी कार्यालय भाड्याचा ‘करार संपल्याचे’ कारण दिले जात असले, तरी प्रत्यक्षात कार्यालयाचे दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त असणारे भाडे परवडत नसल्याने आणि हे भाडे कोणी भरायचे? या आर्थिक वादामुळेच हे कार्यालय बंद झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहरात विशेष लक्ष घालूनही ही नामुष्की ओढवल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या निवडणुकीत केवळ शरद पवार गटाचेच नुकसान झाले असे नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही शहरात अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः शहरात तळ ठोकून, राज्यात ज्यांच्यासोबत सत्तेत आहेत त्याच भाजपच्या पिंपरी पालिकेतील कारभारावर जोरदार ताशेरे ओढले होते. तरीही २०१७ मध्ये त्यांच्या ताब्यातून भाजपकडे गेलेली ही महापालिका त्यांना पुन्हा खेचून आणता आली नाही. गेल्या निवडणुकी एवढ्याच जागांवर समाधान मानत अजित पवार गटाला पुन्हा एकदा मुख्य विरोधी पक्ष म्हणून बसावे लागले आहे. दुसरीकडे, भाजपने मात्र आपल्या जागा कायम राखत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
शहरातील या राजकीय भूकंपानंतर आता शरद पवार गटाचा नवा शहराध्यक्ष कोण होणार आणि आगामी काळात पक्ष या मरगळीतून कसा बाहेर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
