“रामकृष्ण हरी” च्या जयघोषात तुकोबांची पालखी पिंपरी-चिंचवड नगरीत दाखल! भक्ती-शक्ती चौकात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते दिंडी प्रमुख व वीणेकरांचा सन्मान; वारकऱ्यांना आरोग्य किट आणि देशी बियाणांचे वाटप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “रामकृष्ण हरी” च्या टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे काल (बुधवार) पिंपरी-चिंचवड नगरीत अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. निगडी येथील ऐतिहासिक भक्ती-शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पालखी सोहळा प्रमुख, मानकरी आणि वीणेकरांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला आणि पालखीचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या वर्षी वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची विशेष काळजी घेत महापालिकेच्या वतीने प्रत्येक दिंडीला ‘आरोग्य किट’ (प्रथमोपचार पेटी) आणि पर्यावरण वृद्धीसाठी ‘देशी वृक्षांच्या बियाणांच्या’ पाकिटांचे अनोखे वाटप करण्यात आले.
पालखी स्वागताच्या या मंगलप्रसंगी शहरांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी माऊलींच्या रथाचे दर्शन घेतले. यामध्ये आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल कलाटे, उत्तम केंदळे, अनिल घोलप, निलेश नेवाळे, धर्मपाल तंतरपाळे, गायकवाड, निखिल बोऱ्हाडे, प्रवीण भालेकर, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, आशा सूर्यवंशी, शिवानी नरळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश तरस, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले, तसेच सचिन सानप उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालखी सोहळा शहरात असेपर्यंत वारकरी बांधवांना आणि भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जनता संपर्क आणि अग्निशमन विभागाने व्यापक व चोख नियोजन केले होते. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळांची स्वच्छता, २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी, फिरती शौचालये, तात्पुरती प्रकाश व्यवस्था (लाईट्स), अखंडित आरोग्य सेवा आणि आपत्कालीन अग्निसुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तत्परता दाखवत, निगडी येथील पालखी स्वागत कक्षातून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होताच, संपूर्ण रस्त्याची आणि परिसराची झाडलोट करून अवघ्या काही वेळात रस्ते पुन्हा चकाचक केले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर विठ्ठलमय झाले असून नागरिकांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी आणि भाविकांनी शिस्तीत उभे राहून प्रभू श्रीरामाच्या आणि विठ्ठलाच्या जयघोषात माऊलींच्या रथाचे मनोभावे दर्शन घेतले. वारीच्या या आगमनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसराला प्रति-पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


