“ज्ञानोबा माऊली” च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड नगरीत दाखल! मॅगझिन चौकात महापौर रवी लांडगे यांच्याकडून स्वागत; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी धरला वारकऱ्यांसोबत फेर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “ज्ञानोबा-तुकाराम” च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने आज संपूर्ण पिंपरी-चिंचवड नगरी भक्तिमय झाली. तीर्थक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे आज (गुरुवार) सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आगमन झाले. मॅगझिन चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवी लांडगे यांनी माऊलींच्या पालखी रथाला पुष्पहार अर्पण करून अत्यंत भावपूर्ण वातावरणात शहरात स्वागत केले. माऊलींच्या चरणस्पर्शाने पिंपरी-चिंचवड नगरी पावन झाल्याची भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.
यंदाच्या वारीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, स्वागत सोहळ्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः हातात टाळ-मृदंग घेऊन “ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा जयघोष करत वारकऱ्यांच्या गराड्यात उत्साहाने फेर धरला. त्यांच्या या विठ्ठलभक्तीने वारीतील भक्तीचा रंग अधिकच गडद झाला.
या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य निखिल बोऱ्हाडे, सचिन तापकीर, जालिंदर शिंदे, सागर गवळी, नगरसदस्या योगिता नागरगोजे, सोनाली गव्हाणे, अर्चना सस्ते, कविता भोंगाळे, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे, अजिंक्य येळे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने वारीतील वारकरी परंपरेचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दिंडीला महापालिकेतर्फे ‘आरोग्य किट’ (प्रथमोपचार पेटी) चे वितरण करण्यात आले. जेणेकरून प्रवासादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल. यासोबतच, सर्व दिंडी प्रमुख आणि वीणेकरांचा शाल, श्रीफळ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे ‘देशी वृक्षांच्या बियाणांचे पाकीट’ देऊन सन्मान करण्यात आला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शहरात मुक्कामी असलेल्या आणि पालखी मार्गावरून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले आहे. मान्यवरांनी स्वतः पालखी मार्गावरील विविध व्यवस्थांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महापालिकेकडून सुविधा चोखपणे पुरविण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर ठिकठिकाणी २४ तास सुसज्ज आरोग्य तपासणी केंद्रे आणि रुग्णवाहिका (Ambulance) सेवा तैनात करण्यात आली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था, तात्पुरती फिरती स्वच्छतागृहे आणि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी निवासाची उत्तम सोय, मुक्कामस्थळी पुरेशी प्रकाशव्यवस्था (लाईट्स), अग्निसुरक्षा यंत्रणा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समता, सेवा, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मॅगझिन चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

