मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता संजय कुलकर्णींसह दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा! शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे सडेतोड मागणी; हजारो कोटींच्या भ्रष्टाचारामुळे निष्पापांचे जीव धोक्यात, मनपा आयुक्तांच्या ‘ढिम्म’ भूमिकेवर जनक्षोभ
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपो येथील तीन मजली इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ‘भ्रष्ट’ आणि ‘ढिसाळ’ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. या अत्यंत गंभीर आणि मानवनिर्मित आपत्तीला कारणीभूत ठरल्याबद्दल महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तीव्र मागणी आता समोर आली आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे खरमरीत निवेदन सादर केले असून, संपूर्ण पर्यावरण विभागाच्या काळ्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनाही पाठविण्यात आली आहे.
‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने वेळोवेळी पुराव्यांसह वृत्त प्रसिद्ध करून पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या अकार्यक्षमतेवर आणि कामातील दिरंगाईवर बोट ठेवले आहे. मात्र, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या ‘ढिम्म’ आणि पाठराखण करणाऱ्या भूमिकेमुळेच आज १९ निष्पाप नागरिकांचे व कामगारांचे आयुष्य कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले, असा थेट आरोप आता नागरिकांमधून होत आहे. या बातमीच्या माध्यमातून तरी आयुक्तांची कुंभकर्णी झोप उडणार का, हाच खरा प्रश्न आहे.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी निवेदनात महापालिकेच्या अब्जावधी रुपयांच्या चुराड्यावर सडेतोड बोट ठेवले आहे. मोशी कचरा डेपोमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायोमायनिंग’च्या (Biomining) विविध टप्प्यांसाठी शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि आर्थिक लागेबांध्यांमुळे प्रत्यक्ष जमिनीवर काहीही काम झाले नाही.
त्यातच, महापालिकेचा कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्प अनेक दिवसांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत पडला आहे. प्रक्रियाच होत नसल्याने डेपोमध्ये कचऱ्याचे डोंगर वाढत गेले आणि अखेर हा डोंगर शेजारील इमारतीवर कोसळला. भ्रष्टाचाराच्या या ‘कचरा पॅटर्न’मुळे महानगरपालिकेचे हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, हा जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांवर मारलेला दरोडाच आहे, असा दावा उबाळे यांनी केला आहे.
पर्यावरण विभागात केवळ कचरा व्यवस्थापनाचाच नव्हे, तर निविदा प्रक्रियेत आणि विविध प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “संजय कुलकर्णी आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. या विभागाने पिंपरी-चिंचवड शहराला नरकयातना दिल्या आहेत,” अशा तीव्र शब्दांत सुलभा उबाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
वारंवार तक्रारी येऊन आणि प्रसारमाध्यमांनी पुरावे गोळा करूनही मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ‘या’ वादग्रस्त अधिकाऱ्यावर आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांमधील कोणत्या बड्या नेत्याचा वरदहस्त आहे? असा रोकडा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मोशीची दुर्घटना ही नैसर्गिक नसून महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा थेट परिणाम आहे. प्रत्येक वेळी अशा गंभीर प्रकरणांवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केवळ ‘आढावा बैठका’ घेण्याचे नाटक करतात आणि मूळ दोषींना पाठीशी घालतात, ही वस्तुस्थिती आहे. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ महापालिका प्रशासनाला आणि आयुक्तांना जाहीर आव्हान देत आहे की, जर तुमचे हात या भ्रष्टाचारात बरबटलेले नसतील, तर मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांच्यावर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवा!
एकीकडे एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताचे पाणी करत आहेत, तर दुसरीकडे एसी केबिनमध्ये बसून दिरंगाई करणारे अधिकारी मोकळे फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या या तक्रारीनंतर आता तरी आयुक्त कठोर पावले उचलणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवून गप्प बसणार, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
