news
Home पिंपरी चिंचवड अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार; सरचिटणीस चंपत राय यांची हकालपट्टी

अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार; सरचिटणीस चंपत राय यांची हकालपट्टी

जमीन खरेदी घोटाळ्यानंतर सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड; विरोधी पक्षांसह कारसेवकांकडून तीव्र संताप | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love
संपादकीय लेख

रामराज्यात चौकीदारच चोर!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी , ७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

“राम नाम की लूट है, लूट सके तो लूट।

अंतकाल पछताएगा, जब प्राण जाएंगे छूट॥”

संत कबिरांचा हा प्रसिद्ध दोहा अयोध्येतल्या “श्रीरामजन्मभूमी मंदिर”च्या कारभाऱ्यांनी आज शब्दशः आचरणात आणल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. भाविकांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेल्या दान-देणग्यांवर तब्बल ७ कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचे पहिल्याच झटक्यात उघडकीस आले असून, हा आकडा १०० पटीने वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. धार्मिकतेचा बुरखा पांघरून सत्तेची पोळी भाजणाऱ्या ‘संघ-भाजप’ परिवाराच्या आशीर्वादाने चालणाऱ्या या ट्रस्टमध्ये उघड झालेली ही लुटमार म्हणजे ‘रामराज्यात चौकीदारच चोर’ असल्याचे सिद्ध करणारी आहे.

केवळ अयोध्याच नव्हे, तर देशातील मोठ्या देवस्थानांमधील घोटाळ्यांची मालिका थक्क करणारी आहे. केरळच्या शबरीमाला मंदिरातील साडेचार किलो सोन्याची चोरी असो, तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरातील २५० कोटींचा ‘लाडू घोटाळा’ असो, वा वैष्णोदेवी मंदिरातील ५५० कोटींचा ‘चांदी घोटाळा’ असो; देवाच्या नावाने चालणारी ही लुटमार उद्वेगजनक आहे. ही इतर मंदिरे जरी नवसाला पावणारी असली, तरी तेथे चोऱ्या होताना देव गप्प होते. मात्र, अयोध्येचे राम मंदिर हे आध्यात्मिक नसून पूर्णपणे राजकीय हेतूने आणि आंदोलनातून निर्माण झालेले मंदिर आहे.

स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन वर्षांत बाबरी मशिदीत रामलल्लाची मूर्ती घुसवून पसरवलेली चमत्काराची अफवा, त्यानंतर १९८६-८८ मध्ये शाहबानो प्रकरणानंतर उसळलेल्या वादाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली ‘रथयात्रा’ आणि विश्व हिंदू परिषदेने छोट्या बाटल्यांमधून विकलेल्या गंगाजलाच्या पैशांचा कधीच न दिलेला हिशेब; हा या आंदोलनाचा खरा इतिहास आहे. देश-विदेशातून गोळा केलेल्या विटा आणि २०२२ मध्ये मंदिर निर्माणासाठी जमवलेला अब्जावधींचा निधी कुठे गेला, याचा हिशेब रामसेवकांनी कधी विचारलाच नाही.

शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या मंदिराच्या छप्पराला पहिल्याच पावसात लागलेली गळती आणि पूर्णत्वाकडे न गेलेल्या या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी फिरवलेली पाठ, ही या घाईघाईने केलेल्या राजकीय उद्घाटनाची गोम आहे. सगळ्यात मोठा घोटाळा तर हा आहे की, जिथे बाबरी मशीद होती, तिथे आताचे मंदिर उभेच नाही! मग ती मशीद पाडण्याचे कारण काय होते? बाबरी मशीद ही परकीय आक्रमकांनी हिंदूंना अपमानित केल्याचा पुरावा होती, त्याच्या खुणा संताप आणणाऱ्या होत्या; मात्र त्या नष्ट करण्याचे नादान काम संघ-भाजप परिवाराने केले, ही शुद्ध हरामखोरी होती आणि म्हणूनच २०२४ च्या निवडणुकीसाठी हे मंदिर उभारणे त्यांची राजकीय मजबुरी बनली होती.

जर हिंदू समाज खरोखरच राम मंदिरासाठी आग्रही असता, तर त्यांनी जमिनी दान केल्या असत्या; मात्र इथे जमिनी चढ्या भावाने ट्रस्टला विकून कोट्यवधींची माया गोळा करण्यात आली. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने केलेल्या जमीन खरेदीतील हे दोन नमुने पहा. अ) १८ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७:१० वाजता कुसुम पाठक यांच्याकडून राजू तिवारी व सुलतान अन्सारी यांनी जी जमीन २ कोटी रुपयांना खरेदी केली; तीच जमीन अवघ्या ५ मिनिटांनंतर, म्हणजे ७:१५ वाजता ट्रस्टने १८ कोटी रुपयांना विकत घेतली! ब) २० फेब्रुवारी २०२१ रोजी महंत देवेंद्र प्रसाद यांनी दीपनारायण उपाध्याय यांना जी जमीन २० लाख रुपयांना विकली, तीच जमीन अवघ्या ३ महिन्यांत २१ मे २०२१ रोजी ट्रस्टला अडीच कोटी रुपयांना (१२ पट अधिक भावाने) विकण्यात आली. या खरेदीचे साक्षीदार ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि राजकुमार दास होते. हा जाहीर घोटाळा खासदार संजय सिंह यांनी समोर आणला आहे.

यावर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे उत्तर “आम्ही महात्मा गांधींच्या हत्येचेही आरोप ऐकले आहेत, आम्ही चिंता करत नाही,” असे बेफिकीर असणे, हेच भ्रष्टाचाराला दिलेले अभय दर्शवते.

मंदिराचे अकाउंट्स इन चीफ महिपाल सिंग यांनी जेव्हा व्यवस्थापनातील आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे चंपत राय बन्सन यांच्यासमोर ठेवले, तेव्हा सिंग यांनाच पदावरून हटवण्यात आले. रोख रकमेची मोजणी करताना प्रत्यक्ष रकमेपेक्षा कमी रकमेची व्हाउचर्स बनवणे, भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदीचा कोणताही अधिकृत हिशोब न ठेवणे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मूर्ती चरणी येणाऱ्या ‘चढाव्याचा’ हिशोब तपासण्यासाठी महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही (CCTV) फुटेज मुद्दाम डिलीट करणे, हे धंदे तेथे सर्रास सुरू आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष पोलीस पथकाला (SIT) मिळालेल्या मर्यादित फुटेजमधूनच तब्बल ७० चोऱ्या सापडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी “उद्धव ठाकरेंनी दिलेली ४ किलोची चांदीची वीट आणि १ कोटी रुपये कुठे आहेत, त्याची पावती का मिळाली नाही?” असा प्रश्न विचारणे म्हणजे वरातीमागून घोडे धावण्यासारखे आहे. मुद्देमाल गुल झाल्यावर पावती मागण्यात काय हशील? उद्धव ठाकरेंनी दान देण्यापूर्वी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे “देवळांचा धर्म, धर्माची देवळे” हे पुस्तक वाचले असते, तर ही कसरत करावी लागली नसती. प्रबोधनकार थेट लिहितात:

“देव-देवळे भटी सापळे, घातक झाले देशा।

मोडा तोडा, उलथुनि पाडा, उखडा त्याच्या पाशा-“

देवळातील मूर्ती म्हणजे देव नव्हे, तर तो केवळ धोंडा आहे; हे पुजारी आणि भक्त दोघांनाही ठाऊक असते. देवळांचा धर्म म्हणजे भटाच्या पोटाचे गुप्त मर्म आहे, म्हणूनच विष्णू पुराणातील ज्या विष्णूचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र, ज्यांचा जन्मच मुळात कल्पना-विस्तारात झालाय; त्यांचे जन्मस्थानही काल्पनिकच असणार! पण या काल्पनिकतेतूनच देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचे रामायण-महाभारत घडवले जात आहे. संत गाडगे बाबा म्हणायचे, “देवळात पुजाऱ्याचे पोट असते.” आता त्या पोटाला ट्रस्टी आणि बड्या राजकीय चौकीदारांची पोटे जोडली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील २६,००0 एकर जमिनी लाटणाऱ्या भट-पुजाऱ्यांनीही हेच केले आहे.

या घोटाळ्यानंतर अखेर चंपत राय बन्सल यांची सरचिटणीस पदावरून आणि अनिल मिश्रा, गोपाळ राव यांची विश्वस्त पदावरून हकालपट्टी झाली. हिंदीत ‘चंपत’ म्हणजे गायब होणे; चंपत राय स्वतः गायब झाले नाहीत, पण मुद्देमाल गायब करून निभावले हे विशेष! या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी संताप व्यक्त केला असला, तरी त्यात जबाबदारी स्वीकारण्याऐवजी केवळ कांगावा अधिक आहे.

ज्येष्ठ कारसेवक संतोष दुबे यांनी उघडपणे म्हटले आहे की, “SIT हा केवळ एक देखावा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हात पंतप्रधान आणि नागपूरच्या रेशीमबागेने बांधून ठेवले आहेत.” केंद्र सरकारच्या ताब्यातील या ट्रस्टवर दरोडेखोरांची नेमणूक करणारे देशाचे ‘बडे चौकीदार’ आज चिडीचूप आहेत; कारण त्यांनी तोंड उघडले, तर अब्जावधी रुपयांच्या ‘पी. एम. केअर्स फंड’ (PM CARES Fund) चा हिशेब द्यावा लागेल, अशी भीती त्यांना सतावत असावी.

देव-देवळे हा साधू-संन्यासी आणि भिक्षुकांचा पोट भरण्याचा उद्योग असून भक्त ही त्यांची गिऱ्हाइके आहेत. हा खोटा धंदा आता संघ-भाजपने सत्तालाभासाठी आपल्या ताब्यात घेतला आहे, म्हणजेच सोंगाकडून हा धंदा आता ढोंगाकडे गेला आहे. हे नाटक चालवण्यासाठीच उमा भारती, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांना मुख्यमंत्री बनवून परमार्थाचे प्रदर्शन केले जाते. या ढोंगाची हजामत करताना स्वामी विवेकानंद म्हणाले होते: “भारतातील पुरोहितांनी गरिबांसाठी काय केले? भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधी लोक अन्नान्न करत आहेत, ही जनता परमेश्वर नाही का?”

पण जेव्हा देशातील आणि देवाच्या दारातील मुख्य चौकीदारच चोर असतील, तर हा विवेक शेवटी ऐकवायचा कोणाला? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!