news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून मित्राची हत्या; फरार आरोपीला २४ तासांत अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून मित्राची हत्या; फरार आरोपीला २४ तासांत अटक

मोई येथील धक्कादायक प्रकार; दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांकडून आरोपी हिरालाल गौतमला वाघोलीतून बेड्या | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोबाईल चोरीच्या संशयावरून मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला २४ तासांत अटक; दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: मोबाईल चोरल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी अत्यंत शिताफीने अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडवून देणारा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास निघोजे-मोई रोडवरील मोई गावच्या हद्दीत असलेल्या ‘गुरुकृपा हौसिंग सोसायटी’मधील बंडू भगवान बुरुले यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याविषयी ‘डायल ११२’ वर कॉल प्राप्त होताच, दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृताची चौकशी केली असता, त्याचे नाव चाँद याकुब शेख (वय ४२ वर्षे, रा. केशवनगर, चिखली, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाची पत्नी शेजनाज चाँद शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी साक्षीदारांकडे कसून चौकशी केली. यामध्ये मृत चाँद शेख हा त्याचा साथीदार हिरालाल सुभाष गौतम याच्यासोबत राहत होता आणि हिरालाल हा गेल्या दोन दिवसांपासून अचानक फरार झाला असल्याची माहिती समोर आली.

तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे हिरालालचा माग काढला. तो पुणे जवळील वाघोली आणि केसनंद परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार बिराजदार, पोलीस शिपाई गिरी व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाघोली येथे जाऊन सापळा रचला आणि आरोपीला २४ तासांच्या आत शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हिरालाल सुभाषचंद्र गौतम (वय २८ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. ग्राम नागला खादर, पो. बाकेवर, ता. भरताना, जि. इटावा, उत्तर प्रदेश) असे आहे.

पोलिसांनी आरोपीकडे सखोल व तांत्रिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २९ जून २०२६ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास चाँद शेख याने आपला मोबाईल चोरल्याचा संशय हिरालालला होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि हिरालालने चाँद शेख याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले व तो पसार झाला.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोउपनि संतोष जायभाये, पोलीस अंमलदार चेतन सावंत, नरहरी नाणेकर, युवराज बिराजदार, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, आकाश घाडगे आणि शिवाजी मरकड यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे करत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!