पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक आणि कल्पतरू चौक होणार ‘सिग्नल फ्री’; आमदार शंकरशेठ जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: वाकड ते नाशिक फाटा या मुख्य रस्त्यावरील आणि हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या पिंपळे सौदागर येथील अत्यंत वर्दळीच्या पी. के. चौक आणि पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौक येथील वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. हे दोन्ही चौक संपूर्णपणे ‘सिग्नल फ्री’ (Signal Free Junctions) करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) व सबवे प्रकल्पाचे विशेष सादरीकरण नुकतेच पार पडले.
याप्रसंगी चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ‘मे. इन्फ्रार्किंग कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि.’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी या संपूर्ण आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.
सादरीकरणादरम्यान आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या प्रत्येक तांत्रिक बाजूची सखोल माहिती घेतली. दोन्ही चौकांमधील सद्यस्थिती आणि भविष्यातील वाहतुकीचा वाढणारा ताण लक्षात घेऊन नागरिकांची किमान गैरसोय होईल अशा पद्धतीने कामाचे टप्पे ठरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः, पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचू नये म्हणून पावसाळी पाण्याचा निचरा योग्य गतीने होण्यासाठी आणि भुयारी मार्गांची (Subway) रचना अचूक ठेवण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक सूचना दिल्या आहेत.
पिंपळे सौदागर हा भाग हिंजवडी आयटी पार्क आणि जुन्या मुंबई-पुणे हायवेच्या जवळ असल्याने या भागात वाहनांची प्रचंड संख्या असते. येथील समतल विलगक (Grade Separator) प्रकल्पात आधुनिक तांत्रिक गोष्टींचा समावेश असेल. पावसाळ्यात चौकात पाणी साचू नये म्हणून ९०० मिमी व्यासाची विशेष पावसाळी वाहिनी टाकण्यात येईल. तसेच ३० मिनिटांच्या डिटेंशन टाइम क्षमतेची ‘सम वेल’ (Sump Well) उभारून त्यात ५ एचपी क्षमतेचे २ सबमर्सिबल पंप बसवले जातील. प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाणीपुरवठा व जलनिःसारण वाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतरण केले जाईल आणि परिसरात अत्याधुनिक पथदिव्यांची सोय केली जाईल.
१. पी. के. चौकातील अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर चौकातील जीवघेण्या अपघातांना कायमचा आळा बसेल आणि पादचारी व वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल. २. दोन्ही चौक पूर्णपणे सिग्नल फ्री होणार असल्याने गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे नाहीशी होईल. सुदर्शन चौकातून नाशिक फाटाकडे आणि नाशिक फाट्याकडून सुदर्शन चौकाकडे, तसेच पिंपळे गुरवकडून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना विनाअडथळा प्रवास करता येईल. ३. वाहनांना चौकात थांबून राहावे लागणार नसल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल व इंधनाचा अपव्यय टळेल. परिणामी, या परिसरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट होईल. ४. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दैनिक ये-जा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा, स्थानिक नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रवास यामुळे सुसाट आणि सुखकर होणार आहे. तसेच पीएमपीएमएल (PMPML) बस प्रवाशांची वाहतूक अधिक सुरक्षित होईल.
आमदार श्री. शंकरशेठ जगताप आणि शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांनी प्रकल्पाच्या आराखड्याची सखोल पाहणी करून प्रशासनाला हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला महापालिकेचे मुख्य अभियंता श्री. प्रमोद ओंबासे, प्रकल्प कार्यकारी अभियंता श्री. विजय भोजणे, प्रकल्प कार्यकारी अभियंता संध्या वाघ मॅडम, उपअभियंता श्री. राहुल जन्नू आणि उपअभियंता श्री. निलेश दाते उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


