इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी; वारकऱ्यांच्या आस्थेशी कोणतीही तडजोड होणार नाही – महापौर रवी लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: आषाढी वारी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना, लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नदीपात्र फेसाळल्याच्या वृत्ताची अत्यंत गंभीर दखल घेत, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी काल (५ जुलै) इंद्रायणी नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. नदी स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी महापालिका आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याचे तातडीचे निर्देश दिले. पाहणी दौरा आटोपल्यानंतर महापौरांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक आदित्यराजे घुंडरे, दिनेश घुले, माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे, युवा नेते अनिकेत तापकीर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उपअभियंता पंकज धेंडे, आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून महापौरांनी पाण्यात फेस निर्माण होण्यामागील तांत्रिक कारणांचा आढावा घेतला. “नदीच्या पावित्र्याशी किंवा माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट करत महापौरांनी नदीपात्रात वाढलेली जलपर्णी तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले. तसेच, नदीतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. आगामी दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन नदीकाठावर आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था, जीवरक्षक आणि सतर्कता बाळगण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
नदीपात्रात प्रक्रिया न करता घातक सांडपाणी, मैला किंवा रासायनिक द्रव्ये सोडून प्रदूषण करणाऱ्या स्थानिक आस्थापनांवर (उद्योग व संस्था) महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत निर्देश देत, अशा प्रदूषणकारी घटकांवर तातडीने फौजदारी व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
“देशभरातून लाखो वारकरी भाविक अत्यंत आस्थेने आणि श्रद्धेने इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून माऊलींच्या चरणी लीन होतात. त्यामुळे इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वारीमध्ये वारकऱ्यांच्या आस्थेचा पूर्ण सन्मान राखला जाईल. तसेच, इंद्रायणी नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि आळंदी नगरपरिषद यांची लवकरच एक उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी ठोस दीर्घकालीन उपाययोजना निश्चित केल्या जातील.”
– रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड
नदीपात्राची सविस्तर पाहणी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी श्री क्षेत्र आळंदी देवस्थानात जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले व वारी सुखाची होण्यासाठी प्रार्थना केली. या वेळी आळंदी देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महापौरांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


