news
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये पूरस्थिती; ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्या घरात शिरले पाणी, नागरिकांचे अतोनात हाल! मनपा प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात जनक्षोक्ष

चिंचवडमध्ये पूरस्थिती; ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्या घरात शिरले पाणी, नागरिकांचे अतोनात हाल! मनपा प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात जनक्षोक्ष

महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांनी दिला आहे.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

६ जुलै २०२६ पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले: पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड स्टेशन परिसरातील संतोष नगर भागाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. येथील स्थानिक रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि स्थानिक विकासकांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांमधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकमान्य हॉस्पिटलच्या कंपाउंड वॉलमुळे पाण्याचा निचरा रोखला! संतोष नगर परिसरातील विजयश्री अपार्टमेंट, लक्ष्मी निवास आणि शेजारच्या सोसायट्यांमध्ये हे पाणी घुसले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसराला लागूनच असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलने नुकतीच एक मोठी कंपाउंड वॉल (संरक्षक भिंत) बांधली आहे. या भिंतीमुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, पावसाचे सर्व पाणी थेट सोसायट्यांमध्ये आणि नागरिकांच्या घरात घुसल्याने लाखो रुपयांच्या घरगुती साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

 

ओढ्या-नाल्यांचे पाणी उलट वाहू लागल्याने संकट गडद परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांची मान्सूनपूर्व स्वच्छता महापालिकेकडून योग्य प्रकारे न झाल्याने आता नाल्यांचे पाणी थेट उलट (Reverse) वाहू लागले आहे. यामुळे संपूर्ण वसाहतीला सांडपाण्याच्या पुराचा वेढा पडला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पूर्वकल्पना व सूचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्यानेच आज ही बिकट अवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार का? आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सवाल! या गंभीर पूरपरिस्थितीमुळे संतप्त झालेल्या संतोष नगरमधील नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले आणि ज्या संबंधित ठेकेदारांनी पाणी अडवण्यास कारणीभूत ठरणारे बांधकाम केले, त्यांच्याविरोधात फौजदारी व कायदेशीर कारवाई करणार का? असा थेट आणि खणखणीत सवाल नागरिक आता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना करत आहेत. तातडीने या पाण्याचा निचरा करून संरक्षक भिंतीबाबत योग्य तो तांत्रिक निर्णय न घेतल्यास महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांनी दिला आहे. © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!