मॅक्स मंथन डेली न्यूजच्या बातमीचा धडाका! अवघ्या ३ तासांत चिंचवडमधील संतोष नगर येथील पूरपरिस्थितीवर मनपा प्रशासनाची धाव; काम सुरू करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या बातमीचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने प्रचंड धसका घेतला आहे. चिंचवड स्टेशन येथील संतोष नगर भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिकांचे होणारे अतोनात हाल या संदर्भातील वृत्त ‘मॅक्स मंथन’ने प्रसिद्ध करताच, अवघ्या तीन तासांच्या आत महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्धपातळीवर काम सुरू करून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा दिला.
बातमी प्रसिद्ध होताच महापालिकेच्या विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने संतोष नगर पूरग्रस्त भागात धाव घेतली. यामध्ये क्षेत्रीय कार्यालयाचे आणि आरोग्य विभागाचे वाघमारे साहेब, ढोले मॅडम, कार्यकारी अभियंता (Executive Engineer) मुठाळ साहेब, तसेच जलनिःसारण विभागाचे शेख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
शेजारीच असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलने बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे (कंपाउंड वॉल) हा संपूर्ण पाण्याचा निचरा थांबला होता आणि पहिल्यांदाच असा पूरसदृश प्रकार घडल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली असून, सदर अडथळा ठरणाऱ्या बांधकामाबाबत आणि संबंधित व्यवस्थापनावर लवकरच कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे आणि नगरसेवक मंदार देशपांडे यांनी तातडीने संतोष नगर परिसरात प्रत्यक्ष भेट दिली. लोकजागृती साप्ताहिक मुख्य संपादिका सौ श्रद्धा प्रभुणे व बबन प्रभुणे हे ही उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
प्रशासकीय दिरंगाईला जागा न ठेवता, ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’चे कार्यकारी संपादक भाई विशाल जाधव यांनी स्वतः घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जागेवर उभे राहून महापालिका आणि आरोग्य यंत्रणेला संपूर्ण काम चोखपणे करण्यास भाग पाडले. लोकशाहीच्या या खऱ्या जागरूक प्रहरी भूमिकेमुळे आणि ‘मॅक्स मंथन’च्या वृत्ताच्या प्रभावामुळे अवघ्या काही तासांत संतोष नगरमधील नागरिकांना दिलासा मिळाला. या तत्परतेबद्दल संतोष नगर, विजयश्री अपार्टमेंट आणि लक्ष्मी निवास परिसरातील समस्त नागरिक व ज्येष्ठ बांधवांनी ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’चे आणि महापालिका प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


