जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिक्षण विभागाचा साक्षरता जनजागृती चित्ररथ होणार सहभागी; महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: केंद्र शासनाच्या ‘उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमाअतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा विशेष जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे. हा चित्ररथ आकुर्डी ते थेट पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर लाखो वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचा संदेश पोहोचविणार असून, शिक्षण विभागाचे १० विशेष कर्मचारी संपूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी होऊन हे साक्षरता अभियान राबविणार आहेत.
या अभिनव चित्ररथाचे दिमाखदार उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतदादा पाटील विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील, उपसंचालक वंदना वावळ, गणपत मोरे, सहाय्यक संचालक सतीश चौधरी, शिक्षण उपनिरीक्षक रमेश चव्हाण तसेच शिक्षण विभागाचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले,
“संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पवित्र माध्यमातून साक्षरतेचा संदेश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा एक अभिनव उपक्रम आहे. ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ या चित्ररथाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व आणि निरक्षरता निर्मूलनाचा विचार वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहर १०० टक्के साक्षर करण्यासाठी महापालिकेचा ‘अक्षर विश्व’ हा उपक्रम अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. महापालिकेच्या १३५ शाळांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शिक्षण विभागाच्या या संकल्पनेचे कौतुक करताना सांगितले की,
“‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ ही शिक्षण विभागाची अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद संकल्पना आहे. महापालिकेच्या १० शिक्षकांची टीम या संपूर्ण पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी होणार आहे. वारीच्या काळात सुमारे १० लाख वारकरी बांधवांपर्यंत साक्षरता अभियानाचा संदेश आणि शासनाच्या विविध शिक्षणविषयक कल्याणकारी योजनांची माहिती याद्वारे पोहोचविली जाईल. शिक्षण हीच समाजाची खरी ताकद असून गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षित झाला, तर पुढील पिढ्यांचे भविष्य अधिक सक्षम आणि उज्ज्वल होते.”
पालखी मार्गावरील निरक्षर आणि अल्पशिक्षित नागरिकांची अधिकृत नोंदणी करून त्यांना साक्षरतेसाठी प्रोत्साहित करणे. वारीतील वारकरी, नागरिक आणि भाविकांशी थेट संवाद साधून त्यांना शिक्षणाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देणे. महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविणे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

