‘मोशी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!’ – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर; सत्ताधाऱ्यांच्या ‘मनमानी’ कारभारावर डागली तोफ, विरोधी पक्षाला डावलल्यानेच दुर्घटना घडल्याचा घणाघात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. “या दुर्दैवी आणि मानवनिर्मित दुर्घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून, दोषी कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी खंबीर आणि आक्रमक मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. या निमित्ताने भाऊसाहेब भोईर यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या मनमानी व ढिसाळ कारभारा लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत.
महाराष्ट्र शासनामध्ये जरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे सरकार एकत्र असले, तरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खंबीर विरोधी पक्ष म्हणून जनतेचा आवाज उठवत आहे. या दुर्घटनेवरून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला अजिबात विश्वासात न घेता केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शहराचा कारभार हाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाला आणि पर्यावरण विभागाला अत्यंत सडेतोड जाब विचारला आहे. ते म्हणाले,
“मोशी कचरा डेपोतील बायो-मायनिंगच्या कामासाठी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांच्या निविदा (Tenders) मंजूर केल्या आहेत. एवढा अफाट पैसा खर्च होऊनही कचऱ्याचा ढीग सपाट का करण्यात आला नाही? ठेकेदाराचे काम इतक्या संथ गतीने का सुरू होते? याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच येथे कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी विरोधी पक्षाने धोक्याची घंटा वाजवूनही प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याच गुन्हेगारी दुर्लक्षामुळे आज हा १९ निष्पाप कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.”
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात आणि नागरी प्रश्नांवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा दांडगा अभ्यास आणि दूरदृष्टी नेहमीच दिसून आली आहे. कचरा डेपोचे संकट भविष्यात शहरावर कसे ओढवू शकते, याबाबत त्यांनी वेळोवेळी सभागृहात आणि जाहीरपणे इशारा दिला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या चांगल्या आणि अभ्यासू सूचनांचा फायदा सत्ताधारी भाजप घेत नाही, हेच पिंपरी-चिंचवडकरांचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
केवळ टक्केवारी आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यात मग्न असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जर विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन काम केले असते, तर आज ही अंगावर काटा आणणारी भीषण दुर्घटना नक्कीच टाळता आली असती. भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाकडे खालील मागण्या अत्यंत खंबीरपणे मांडल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या उर्वरित सर्व कामगारांना युद्धपातळीवर आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यावे. दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व कामगारांना महापालिकेच्या वतीने तातडीने सर्वोत्तम आणि संपूर्ण मोफत वैद्यकीय उपचार देण्यात यावे. निकृष्ट व संथ काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर व निष्काळजी अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. भविष्यात मोशी परिसरात किंवा कचरा डेपोत अशी दुर्घटना पुन्हा कधीही घडू नये, यासाठी सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली असून, आता तरी प्रशासन दोषींवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
