आषाढी यात्रेसाठी अमरावती जिल्ह्यातून पंढरपूरसाठी २५४ जादा बसेस; ४० पेक्षा जास्त प्रवासी असल्यास थेट गावातून सुटणार विशेष बस
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे , ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दि. २० ते ३० जुलै दरम्यान होणाऱ्या भव्य आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसली आहे. अमरावती जिल्ह्यातील आणि विदर्भातील हजारो विठ्ठलभक्त आणि वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास सुलभ व सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्ह्यातील विविध एसटी आगारांतून एकूण २५४ जादा बसेस सोडण्याचे विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगारांमधून बसेसचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडल्या जातील. अमरावती ३६, बडनेरा ३६, परतवाडा ३०, वरुड ३६, चांदूर रेल्वे २१, दर्यापूर ३०, मोर्शी ३२ आणि चांदूर बाजार ३३ अशा एकूण २५४ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील भाविकांसाठी महामंडळाने मोठी सवलत दिली आहे. कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध झाल्यास, थेट त्या खेड्यातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्यात येईल. यासाठी भाविक, प्रवासी किंवा संबंधित गावच्या सरपंचांनी नजीकच्या आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी एक विशेष व कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमधील चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांची नावे व त्यांचे मोबाईल नंबर बसमध्ये सर्वांना दिसतील अशा ठळक ठिकाणी प्रदर्शित केले जातील. यामुळे प्रवासादरम्यान किंवा पंढरपूरला पोहोचल्यानंतर भाविकांना संपर्क करणे अत्यंत सोपे जाणार आहे. तसेच पंढरपूरहून परत येणाऱ्या भाविकांसाठी परतीच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण (Reservation) करण्याची सोयही महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
भाविकांच्या माहितीसाठी महामंडळाने प्रमुख मार्ग आणि त्यांचे प्रवास भाडे निश्चित केले आहे. अमरावती – पंढरपूर (मार्गे वाशिम, परभणी) : ₹ १,०४६, परतवाडा – पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) : ₹ १,१३५, वरुड – पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) : ₹ १,२१२, मोर्शी – पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) : ₹ १,१४६, चांदूर बाजार – पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) : ₹ १,१२४, चांदूर रेल्वे – पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) : ₹ १,११२, दर्यापूर – पंढरपूर (मार्गे मुर्तिजापूर, परभणी) : ₹ १,०२४
जिल्ह्यातील सर्व विठ्ठलभक्त आणि वारकरी बांधवांनी आपल्या नजीकच्या एसटी आगारात चौकशी करून बसेसचे आरक्षण करावे आणि सुरक्षित व खात्रीशीर शासकीय बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
