हिंदू-मुस्लिम एकोप्याच्या दिंडीत काँग्रेसकडून २५० रेनकोट वाटप; दापोडीत रंगला वारीतील धार्मिक ऐक्याचा अनोखा सोहळा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले असताना, दापोडी येथे समाजमनावर गारुड घालणारा आणि हिंदू-मुस्लिम बंधुभावाची वीण अधिक घट्ट करणारा एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. दापोडीतील यांत्रिकी भवन परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवणारी दिंडी वारकरी सेवा मोठ्या उत्साहात करण्यात आली.
या अनोख्या आणि धार्मिक एकोपा जपणाऱ्या वारी सेवा सोहळ्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वारकरी बांधवांसाठी सेवा स्वरूपात २५० रेनकोटचे वाटप करण्यात आले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना हा मोठा दिलासा ठरला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वारीसेवेची परंपरा यंदाही दापोडी यांत्रिकी भवनचे कर्मचारी आणि दिंडी सेवा आयोजक हमीद उर्फ बबलू शेख मित्रपरिवाराच्या वतीने अविरतपणे जपण्यात आली. वारीतील वैष्णवांसाठी येथे भव्य अन्नसेवा उपक्रम राबविण्यात आला. सर्व धर्मसमभावाचा आणि संतांच्या समतेच्या विचारांचा हा सोहळा येथे अत्यंत आनंदात पार पडला.
या दिंडी सोहळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हमीद उर्फ बबलू शेख यांच्या कन्या साहिबा शेख आणि तल्विन शेख यांच्या ‘मोईनुद्दीन फिजिओथेरपी सेंटर’च्या वतीने वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा छावणी उभारण्यात आली होती. या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, पायांना आलेले फोड व थकवा दूर करण्यासाठी फूट मसाज सेवा, आरोग्यवर्धक औषधांचे वाटप आणि प्रथमोपचार पेट्यांचे (First-Aid Kits) वाटप करण्यात आले.
या धार्मिक आणि सामाजिक ऐक्याच्या कौतुकास्पद सोहळ्याप्रसंगी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दापोडी यांत्रिकी भवन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दिंडी सेवा आयोजक हमीद उर्फ बबलू शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, छावा मराठा युवा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेश काँग्रेस नेते केदार पाटील, काँग्रेसचे माजी सरचिटणीस कबीर मोहम्मद, विल्यम साळवी, हिराचंद जाधव, हरीश डोळस, रवी कांबळे, सार्थक बाराथे, नितीन कांबळे, अनुप अडागळे आदी पदाधिकारी आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भेदभाव अमंगळ’ हा संतांचा संदेश प्रत्यक्षात जगणाऱ्या या दिंडी सेवेचे संपूर्ण शहरातून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

