news
प्रशासनाच्या पर्यवेक्षकीय हलगर्जीपणामुळेच मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटना; शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदनमनपा आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची चोख सोय६ महिन्यांत ४ लाख केसेस आणि ४० कोटींचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे आक्रमक पाऊलपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा उद्धट व्यवहारमहापालिका सेवक पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; शेकडो कर्मचाऱ्यांनी नोंदवला सहभाग
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा उद्धट व्यवहार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा उद्धट व्यवहार

माजी महापौर योगेश बहल यांच्या वरदहस्ताने मिळालं तिकीट, पण सुरुवातीलाच वादाचा ठपका; पत्रकारांसह लिफ्टमनकडून ताईंना सडेतोड उत्तर | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आता नगरसेविका शिकवणार पत्रकारांना प्रोटोकॉल? महापालिकेच्या लिफ्टमध्ये नवनिर्वाचित ‘ताईं’चा अहंकार; महिला पत्रकारांशी अरेरावी करत लिफ्टमनवर काढली आगपाखड!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, १४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नुकतीच एक चीड आणणारी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नवनिर्वाचित नगरसेविका ‘ताईं’नी आपल्या अज्ञानाचा आणि पदाच्या अहंकाराचा जाहीर प्रदर्शन केले आहे. शिक्षण मंडळाच्या सभापतींच्या सत्कार समारंभावरून लिफ्टने तळमजल्यावर जात असताना, या नगरसेविका ताईंनी तिथे उपस्थित असलेल्या महिला पत्रकारांना लिफ्टमध्ये प्रवेश करण्यास अप्रत्यक्षपणे मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर पालिकेच्या लिफ्टमनवर डाफरत त्याला थेट ‘प्रोटोकॉल’ शिकवण्याचे बेताल धडे दिल्याने पालिका वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण समिती सभापतींच्या सन्मानानंतर नगरसेविका ताई सभापतींसह लिफ्टमध्ये प्रवेश करत होत्या. यावेळी त्यांनी लिफ्टमध्ये आधीच असलेल्या महिला पत्रकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या इतर दोन सहकाऱ्यांना आत घेण्याचा प्रयत्न केला. लिफ्टमध्ये अजिबात गर्दी नसतानाही केवळ आपला राजकीय रुबाब दाखवण्यासाठी नगरसेविका ताईंनी तिथे उपस्थित महिला पत्रकारांसमोर मोठा ‘एटीट्यूड’ दाखवला.

त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट लिफ्टमनवर रागावून त्याला ‘प्रोटोकॉल’ पाळण्याचे कडक आदेश देण्यास सुरुवात केली. या हुकूमशाहीवर संतापलेल्या महिला पत्रकाराने, “तुम्ही पत्रकारांचा अपमान करत आहात!” अशा कडक शब्दांत ताईंना जागेवरच ठणकावले आणि हातातील वृत्तपत्र दाखवले, तेव्हा कुठे नगरसेविका ताईंचे तोंड बंद झाले.

लिफ्टमधून उतरून पत्रकार मॅडम निघून गेल्यानंतरही नगरसेविका ताईंचा अहंकार शांत झाला नव्हता. त्यांनी पुन्हा एकदा त्या गरीब लिफ्टमनला खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षानुवर्षे पालिकेत सेवा देणाऱ्या आणि सर्वांना ओळखणाऱ्या स्वाभिमानी लिफ्टमनने, “पत्रकारांनाही या लिफ्टचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे सांगत पत्रकारांची बाजू लावून धरली आणि ताईंना त्यांची जागा दाखवून दिली.

या संपूर्ण प्रकारानंतर पालिका वर्तुळात एकच शंका उपस्थित केली जात आहे की, नगरसेविका ताई पत्रकारांना का डावलत होत्या? पत्रकारांपासून त्यांना नेमका कशाचा त्रास होणार होता? त्यांची कोणती गुपिते उघडी पडण्याची भीती त्यांना सतावत होती? यामुळे “दाल में कुछ काला है” या म्हणीप्रमाणे या नवनिर्वाचित ताईंच्या कारभाराची सखोल माहिती घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

नेहरूनगर भागातील या नवनिर्वाचित नगरसेविका ताई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच वर्षे पक्षासाठी काम करत होत्या. एका सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत शेवटी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर योगेश बहल साहेबांच्या वरदहस्तामुळे आणि कृपेमुळे त्यांना निवडणुकीत तिकीट मिळाले आणि त्या निवडून आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे.

परंतु, सामान्य कुटुंबातून आलेल्या या लोकप्रतिनिधीला पदाची हवा इतकी लवकर डोक्यात जाईल, अशी अपेक्षा मतदारांनी केली नव्हती. निवडणुकीत निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपला तोल ढळू न देता, पाय जमिनीवर ठेवून ‘डाऊन टू अर्थ’ राहून समाजकार्य करणे गरजेचे असते. मात्र, सुरुवातीलाच अहंकार आड आल्यास त्याचे गंभीर राजकीय भुर्दंड भविष्यात भोगावे लागतात, हे ताई विसरल्याचे दिसते.

‘नगरसेविका’ म्हणजे जनतेने निवडून दिलेली ‘नगराची सेविका’ असते. नागरिकांना स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, लाईट आणि उत्तम आरोग्य सेवा मिळवून देऊन सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य करणे हे त्यांचे मूळ कर्तव्य आहे. महानगरपालिकेची लिफ्ट ही लोकप्रतिनिधींची खाजगी किंवा वैयक्तिक मालमत्ता नसून ती नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकार या सर्वांसाठी आहे, याचे भान राखणे आवश्यक आहे.

तसेच, लिफ्टमन हा देखील एक माणूस असून तो पालिकेचा हक्काचा कर्मचारी आहे. केवळ लोकप्रतिनिधी झालो म्हणून कर्मचाऱ्यांशी ‘अरे-तुरे’ची भाषा वापरणे आणि त्यांचा वारंवार अपमान करणे हे अत्यंत क्लेशदायक असून हे प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तातडीने बंद झाले पाहिजेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी असा उद्धट व्यवहार करणाऱ्या या नवनिर्वाचित नगरसेविका ताईंचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात आहे. भविष्यात कोणत्याही नगरसेवकाकडून अशी चूक होऊ नये, हीच अपेक्षा!

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!