पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची धडक कारवाई! ६ महिन्यांत तब्बल ४ लाखांवर वाहनचालकांवर दंडात्मक बडगा; ४० कोटींहून अधिकचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. चालू वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवायांमध्ये तब्बल ४,०१,७८७ केसेस नोंदवण्यात आल्या असून, वाहनचालकांना एकूण ४० कोटी ८३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा प्रचंड दंडाचा इंगा दाखवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने, पोलीस सह आयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड यांच्या थेट सूचना व मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.
वाहतूक शाखेने विविध १३ प्रमुख नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ‘विशेष हेड’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
| क्र. | विशेष हेड कारवाई प्रकार | एकूण केसेस | आकारलेला दंड (रुपये) |
| १. | फॅन्सी नंबर प्लेट कारवाई | ३८,४१२ | ३,१८,९०,०००/- |
| २. | मोबाईल टॉकींग (चालू वाहनावर बोलणे) | १२,३३४ | १,८८,०८,०००/- |
| ३. | सिग्नल जम्पींग कारवाई | ५४,३३८ | ४,३६,३२,५००/- |
| ४. | ट्रिपल सिट (त्रिरथ) कारवाई | ४०,४१९ | ४,१२,५२,०००/- |
| ५. | जड व अवजड वाहन नियमभंग | ४८,२७० | ६,५०,४३,०००/- |
| ६. | गाड्यांना काळी काच लावणे | १८,१७४ | २,२१,४२,०००/- |
| ७. | मॉडीफाईड (फटाके फोडणारे) सायलेंसर | ७,२०६ | ७२,०३,०००/- |
| ८. | नियमबाह्य बसेसवर कारवाई | १७,५७४ | २,१७,५८,६५०/- |
| ९. | बेशिस्त रिक्षांवर कारवाई | १८,४८६ | १,७१,०३,७५०/- |
| १०. | विना परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) वाहन चालवणे | ५,९५९ | २,७४,७०,०००/- |
| ११. | नो-पार्किंगमधील टोईंग कारवाई | ६६,२२३ | ३,५२,९५,५००/- |
| १२. | वाहतुकीस अडथळा निर्माण करणे | ४३,५६७ | ४,५९,५२,५००/- |
| १३. | विना हेल्मेट दुचाकी चालवणे | ३०,८२५ | ३,०७,७९,०००/- |
| एकूण कारवाया | ४,०१,७८७ | ४०,८३,२९,९००/- |
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आणि परिसरात सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. नियमांचे उल्लंघन करून होणारी दंडात्मक तसेच पुढील न्यायालयीन कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच, शहरातील वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन आणि इतर कोणत्याही वाहतूक विषयक तक्रारी व समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नागरिकांनी ‘ट्राफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉट’ क्रमांक ८७८८६४९८८५ या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त श्री. विक्रांत देशमुख यांच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
