“लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी ‘SIR’ अभियानात बीएलओंना सहकार्य करावे!” – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त करण्यावर महापालिकेचा भर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) अभियानाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील प्रत्येक नागरिकाची माहिती शंभर टक्के अचूक व अद्ययावत करण्यासाठी महानगरपालिका पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या अभियानाच्या सद्यस्थितीचा आणि महापालिका स्तरावरील प्रगतीचा सविस्तर आढावा आज महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका विशेष बैठकीत घेतला.
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सुरू असलेल्या घरोघरी भेटी, नवीन अर्जांचे संकलन, माहितीची प्रत्यक्ष पडताळणी आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद या सर्व बाबींचा आयुक्तांनी सखोल आढावा घेतला आणि प्रक्रियेत कोणतीही त्रुटी न ठेवण्याचे कडक निर्देश दिले.
या महत्त्वाच्या बैठकीस पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उप-आुक्त सचिन पवार, मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, अर्चना यादव, सचिन पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उप-आयुक्त सचिन पवार यांनी ‘SIR’ अभियानाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. बीएलओंकडून सुरू असलेल्या घरोघरी भेटी, प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती आणि मतदार नोंदणीची तांत्रिक प्रक्रिया याविषयी त्यांनी माहिती दिली. निर्धारित कालमर्यादेत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय चोख नियोजन केले असून वरिष्ठ पातळीवरून याचा नियमित पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, “मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करणे हे लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक बीएलओने अत्यंत जबाबदारीने आणि काळजीपूर्वक प्रत्येक नोंदीची पडताळणी करावी.”
शहरातील नागरिकांना आवाहन करताना आयुक्त म्हणाले, “विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा तुमच्या हक्काच्या मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी आहे. त्यामुळे जेव्हा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करा. जर कोणाच्या नावात, पत्त्यात, छायाचित्रात किंवा इतर तपशीलात काही दुरुस्ती करायची असेल, तर त्यांनी तातडीने संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.”
उप-आयुक्त सचिन पवार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले असून प्रत्येक अर्जाची वेळेत विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीएलओ प्रत्येक घरापर्यंत पोहोचत असून नागरिकांनीही ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी वेळेत कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी सांगितले.
सर्व पिंपरी-चिंचवडकर नागरिकांसाठी महत्त्वाची चौकट,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व मतदार बंधू-भगिनींना सूचित करण्यात येते की, शहरात दिनांक ३० जून २०२६ पासून मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे.
तुमच्या नजीकच्या मतदान केंद्रावर (शाळेत) जाऊन संबंधित ‘बीएलओ’ (BLO) यांची भेट घ्या किंवा बीएलओ तुमच्या घरी आल्यास त्यांना ‘ईएफ फॉर्म’ (EF Form) भरून देऊन त्याची अधिकृत पोहोच पावती स्वतःकडे जपून ठेवा.
नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्यासाठी महापालिकेने lnk6.in/PCMCHO/eo6c-QYOc हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
जर तुम्ही २९ जुलै २०२६ पूर्वी आपला ‘इन्युमरेशन फॉर्म’ (Enumeration Form) भरला नाही, तर तुमचे नाव आगामी प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, याची सर्व नागरिकांनी गंभीर नोंद घ्यावी.
– अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पिंपरी-चिंचवड मनपा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
