news
Home मुख्यपृष्ठ अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस दल सक्रिय; डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये जनजागृती सत्र

अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस दल सक्रिय; डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये जनजागृती सत्र

माहिती देणाऱ्यांची ओळख राहणार गुप्त; पोलिसांकडून 'एनडीपीएस' कायद्याचे महत्त्व व हेल्पलाईन क्रमांकांची माहिती जाहीर | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तरुणाईला व्यसनाधिनतेपासून वाचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पाऊल; डी. वाय. पाटील महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी विशेष कार्यशाळा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, १७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या (Drugs) विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एका विशेष जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे आश्वासन देत, पोलिसांनी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांविषयी काहीही माहिती मिळाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त श्री. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड यांच्या आदेशानुसार या व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. सचिन कदम यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले.

कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) च्या माध्यमातून अंमली पदार्थांचे विविध प्रकार, त्यांचे शरीरावर होणारे घातक परिणाम आणि एन.डी.पी.एस (NDPS) अधिनियमांतर्गत असलेल्या कडक कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली. “अंमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर त्याचे कुटुंब, करिअर आणि संपूर्ण समाज उद्ध्वस्त करू शकते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही तात्पुरत्या आनंदासाठी याच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधातही मार्गदर्शन करण्यात आले. औंध रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे मानसोपचार तज्ज्ञ श्री. हनुमंत हाडे यांनी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. विमल व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक व समुपदेशक श्री. विल्यम साळवी यांनी उपस्थित २५० ते ३०० विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याची आणि इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्याची सामूहिक शपथ दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवाहन केले आहे की, शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.

अंमली पदार्थ विरोधी पथक (गुन्हे शाखा): ८६००००२३२० , मानस हेल्पलाईन क्रमांक: १९३३ , पोलीस कंट्रोल रूम: ११२

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!