news
Home नांदेड मराठवाड्यात चित्रपट संस्कृतीचा नवा सुवर्णअध्याय; नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२७ ची घोषणा

मराठवाड्यात चित्रपट संस्कृतीचा नवा सुवर्णअध्याय; नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२७ ची घोषणा

जागतिक दिग्गजांची लागणार उपस्थिती; लघुपट अन् चित्रपटांसाठी लाखांची बक्षीसे, प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नांदेडमध्ये प्रथमच रंगणार ‘नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२७’चा भव्य सोहळा; २ ते ७ फेब्रुवारीदरम्यान जागतिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची लागणार उपस्थिती!

नांदेड/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी , २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

नांदेड: ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या नांदेड शहराच्या सांस्कृतिक पटलावर एक नवा सुवर्णअध्याय लिहिला जाणार आहे. नांदेडमध्ये प्रथमच ‘नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२७’ (NIFF) चे आयोजन करण्यात आले असून, २ ते ७ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत हा भव्य महोत्सव रंगणार आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड शहर जागतिक चित्रपटविश्वाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असून, देश-विदेशातील नामवंत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षक एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.

शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह महाराजांच्या पावन स्मृतींमुळे जगभर प्रसिद्ध असलेले नांदेड हे शहर साहित्य, कला, नाटक आणि सामाजिक चळवळींचे समृद्ध केंद्र आहे. या भूमीतील समृद्ध परंपरेला जागतिक चित्रपटसृष्टीची जोड देत नांदेडला ‘सांस्कृतिक पर्यटन’ आणि ‘चित्रपट संस्कृतीचे नवे केंद्र’ बनविण्याचा संकल्प या महोत्सवातून साकार होत आहे.

महोत्सवाचे आयोजन सनमान स्क्वेअर सितारा सिनेमा तसेच नांदेड शहरातील इतर प्रमुख चित्रपटगृहांमध्ये केले जाणार आहे. चित्रपट प्रदर्शनासोबतच विविध कार्यशाळा, मास्टरक्लास, परिसंवाद, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही विशेष आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धात्मक विभागांचा समावेश करण्यात आला असून विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.

आंतरराष्ट्रीय चित्रपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹१,५०,००० | द्वितीय पुरस्कार ₹७५,०००

मराठी चित्रपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹१,५०,००० | द्वितीय पुरस्कार ₹७५,०००

(याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा, छायाचित्रण आणि संकलन असे विशेष पुरस्कारही दिले जातील.)

आंतरराष्ट्रीय लघुपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹३०,००० | द्वितीय पुरस्कार ₹२०,०००

आंतरराष्ट्रीय लघु माहितीपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹३०,००० | द्वितीय पुरस्कार ₹२०,०००

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी लघुपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹२५,००० | द्वितीय पुरस्कार ₹२०,०००

मराठी लघुपट विभाग: प्रथम पुरस्कार ₹२५,००० | द्वितीय पुरस्कार ₹२०,०००

फेस्टिवल डायरेक्टर रमेश होलबोले यांनी माहिती देताना सांगितले की, “नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून, स्थानिक प्रतिभेला जागतिक व्यासपीठाशी जोडणारा सांस्कृतिक सेतू ठरणार आहे. मराठवाड्यातील नवोदित कलावंतांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.”

देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांनी आपल्या चित्रपटांच्या प्रवेशिका महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळ www.niff.in किंवा FilmFreeway या व्यासपीठाद्वारे पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी आयोजकांनी +९१ ८४४६२७९००५ किंवा niff26official@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!