news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड महापालिकेतील एजंटगिरी अन् भ्रष्टाचाराविरोधात शिपाई वर्ग आक्रमक; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे चार पानी निवेदन

महापालिकेतील एजंटगिरी अन् भ्रष्टाचाराविरोधात शिपाई वर्ग आक्रमक; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे चार पानी निवेदन

फायली थेट घरी नेणाऱ्या कंत्राटदारांवर अन् पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; पिंपरी-चिंचवड पालिका वर्तुळात खळबळ | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिपायांचा थेट ‘एल्गार’! फाईल गहाळ प्रकरणावरून वरिष्ठ अधिकारी अन् एजंटांच्या मनमानीविरोधात आयुक्तांकडे लेखी तक्रार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी आणि अग्निशामक यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांमधील सुमारे १५० चतुर्थ श्रेणी (शिपाई) कर्मचाऱ्यांनी आपल्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात थेट ‘एल्गार’ पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी स्वरूपात सविस्तर तक्रार दाखल केल्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या शिपाई कर्मचाऱ्यांवर विनाकारण होत असलेला अन्याय आणि प्रशासकीय गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा लढा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर करण्यात आलेल्या चार पानी निवेदनात शिपाई वर्गाने कार्यालयातील विदारक वास्तवावर प्रकाश टाकला आहे. महापालिकेतील कार्यालयांमध्ये मंजुरीसाठी किंवा इतर कार्यालयीन कामांसाठी आलेल्या फाईल्स हाताळणे, एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणे हे शिपायांचे काम असताना, सध्या सर्वच विभागांमध्ये कंत्राटदार, आर्किटेक्ट, ठेकेदार आणि त्यांचे एजंट यांचे फावले आहे. अधिकारी कार्यालयात येण्यापूर्वीच हे एजंट दाखल होतात आणि दिवसभर कार्यालयाचा ताबा त्यांच्याच हातात असतो. फायली स्वतःकडे ठेवून घेणे, एजंटांनी त्या स्वतःच कार्यालयाबाहेर घेऊन जाणे आणि काही वेळा महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या फायली थेट घरी घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व नियमबाह्य प्रकार संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने किंवा संमतीनेच होत असल्याचे शिपायांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे.

कार्यालयामध्ये एजंटांचा वावर आणि फायली बाहेर नेण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे, एखादी फाईल गहाळ झाल्यास नाहक शिपाई कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवली जाते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत शिपायांनी स्पष्ट मागणी केली आहे की, यापुढे कार्यालयीन फाईल गहाळ झाल्यास त्याला शिपाई कर्मचाऱ्याला जबाबदार धरू नये; तर त्या-त्या कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणेलाच थेट जबाबदार धरून कठोर कारवाई करावी.

या धडक तक्रारीमुळे महापालिका प्रशासनातील अनागोंदी कारभाराला मोठा आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ दबावाखाली काम न करता आता आपल्या हक्कासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी एकत्र आले आहेत, ज्यामुळे शिपाई वर्गाची सचोटी आणि प्रामाणिकपणा समोर आला आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, या गंभीर तक्रारीची दखल घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी नेमकी काय कारवाई करतात आणि या चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीला कसा लगाम घालतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!