दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये २ तासांचे मौनांदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!
अहिल्यानगर/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपर लीक प्रकरण आणि दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्लाच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्रमक आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमधील महात्मा गांधी स्मारकासमोर दोन तासांचे लाक्षणिक ‘मौनांदोलन’ केले.
राळेगणसिद्धी येथून अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मौनांदोलन केले. या आंदोलनाला विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णा हजारे यांचे सहकारी दत्ता आवारी यांनी सांगितले की, ८९ वर्षीय अण्णा हजारे यांना गेल्या २-३ दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत होता. तरीही दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या बातम्या पाहून अत्यंत व्यथित झालेल्या अण्णांनी मौनांदोलनात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. आंदोलनस्थळी पोहोचताना विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या आठवणीने अण्णांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
मौनांदोलनाच्या एक दिवस आधी अण्णा हजारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपले मत व्यक्त केले. पत्रात त्यांनी नमूद केले. २०२४ मध्ये NEET पेपर लीक प्रकरण समोर आले होते आणि २०२६ मध्ये या समस्येमुळे सुमारे २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि शिक्षण व्यवस्थेवरील ढासळलेला विश्वास पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. एका मंत्र्याच्या राजीनाम्याने सरकार पडत नाही, तर कारभारात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढते.पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा आहे. लोकशाहीत विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न मानता त्यांच्या वेदना समजून घेऊन सकारात्मक संवादातून मार्ग काढला पाहिजे.
मौनांदोलन संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले:
“मी माझ्या आयुष्यात २२ मोठी आंदोलने केली, पण एकाही आंदोलनात लाठीहल्ला झाला नाही. हिंसाचार हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. देशामधील युवक ही आपली खरी ताकद आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असल्याने मी त्यांना थेट पत्र लिहून या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
