news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये लूट; १० रुपये शुल्काऐवजी उकळले जातायत हजारो रुपये

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये लूट; १० रुपये शुल्काऐवजी उकळले जातायत हजारो रुपये

नियमबाह्य संस्थांना भाजप नेत्यांचे अभय; उपआयुक्त पंकज पाटील यांच्याकडून थेट करार रद्द करण्याचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या जिममध्ये नागरिकांची उघडउघड लूट! १० रुपयांच्या नियमाला हरताळ फासत महिन्याला ७०० ते १,००० रुपयांची बेकायदेशीर वसुली; क्रीडा विभागाचे दुर्लक्ष, भाजप नेत्यांच्या शिफारस पत्रांमुळे प्रशासनात खळबळ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान ,२४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज :

पिंपरी चिंचवड: सर्वसामान्य नागरिकांना आणि तरुण वर्गाला अत्यल्प दरात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळा (जिम) आता खाजगी संस्था, मंडळे आणि दलालांच्या दावणीला बांधल्या गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालिकेच्या अधिकृत नियमानुसार नागरिकांकडून दरमहा केवळ १० रुपये फी आणि २० रुपये प्रवेश शुल्क घेणे बंधनकारक असताना, खाजगी चालकांकडून सर्रास ७०० ते १,००० रुपयांची बेकायदेशीर वसुली केली जात आहे. या महालूटप्रकरणी महापालिकेचा क्रीडा विभाग गाढ झोपेत असून भाजपच्या बड्या नेत्यांकडूनच या नियमभंग करणाऱ्या संस्थांना मुदतवाढीसाठी शिफारस पत्रे दिली जात असल्याने पालिका वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या एकूण ८६ व्यायामशाळा आहेत. त्यापैकी ५१ व्यायामशाळा क्रीडा विभागाने ११ महिन्यांच्या करारावर सेवा शुल्क तत्त्वावर खाजगी संस्था व मंडळांना चालवण्यासाठी दिल्या आहेत. महापालिकेची मेहेरबानी: पालिका या संस्थांना मोफत जागा, कोट्यवधींचे व्यायामाचे आधुनिक साहित्य आणि जागेच्या देखभालीसाठी दरमहा २ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्यही देते. नागरिकांची पिळवणूक: एवढी सवलत मिळूनही या संस्था नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा मासिक फी वसूल करत आहेत. काही ठिकाणी अनामत रक्कमेच्या (डिपॉझिट) नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहेत.

महापालिकेच्या करारातील अटींनुसार पालिकेच्या शाळांमधील किमान २५ विद्यार्थ्यांना या जिममध्ये मोफत प्रवेश देणे सक्तीचे आहे. परंतु, एकाही विद्यार्थ्याला आत पाऊल ठेवू दिले जात नाही.जिमच्या जागांचा वापर खाजगी वाढदिवस, पार्ट्या आणि राजकीय कार्यक्रमांसाठी केला जात असून पालिका जागेवर खाजगी चालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. पालिकेने दिलेले महागडे साहित्य जाणूनबुजून खराब केले जात आहे. कोणतीही नोंद न ठेवता साहित्याची मोडतोड करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले जात आहे. उर्वरित ३५ पैकी अर्ध्याहून अधिक व्यायामशाळा साहित्याअभावी आणि दुरवस्थेमुळे बंद पडल्या आहेत.

संत तुकाराम नगर येथील महिला व पुरुष व्यायामशाळेत ५०० ते १,००० रुपये फी उकळली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नियमभंग करणाऱ्या ‘हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी’लाच पुन्हा संचालन मिळावे म्हणून महापौर रवी लांडगे यांनी शिफारस पत्र दिले आहे. तर विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनीही स्वतंत्र पत्राद्वारे या संस्थेला मुदतवाढ देण्याची शिफारस केल्याची कागदपत्रे समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून खाजगी संस्था व व्यायामशाळांना ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ज्यादा फी वसूल करणाऱ्या संस्थांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट करारनामा रद्द केला जाईल. तसेच फी आकारणीबाबत नव्याने कडक धोरण आखण्यात येत आहे. ज्या जिममध्ये जादा शुल्क आकारले जात आहे, तेथील सभासदांनी तक्रार केल्यास कठोर कारवाई केली जाईल.”

— पंकज पाटील (उपआयुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका)

महापालिकेची जागा आणि सार्वजनिक निधीचा वापर करून स्वतःचा ‘गोरखधंदा’ चालवणाऱ्या या लुटारू संस्थांचे करार तात्काळ रद्द करून, महापालिकेने या सर्व व्यायामशाळांचे नियंत्रण स्वतःकडे घ्यावे, अशी तीव्र मागणी आता पिंपरी-चिंचवडकर नागरिकांमधून केली जात आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!