news
Home पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे यांच्या दिल्ली दौऱ्याने पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; राजनाथ सिंह अन् नितीन गडकरींकडे मांडल्या मागण्या

महापौर रवी लांडगे यांच्या दिल्ली दौऱ्याने पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; राजनाथ सिंह अन् नितीन गडकरींकडे मांडल्या मागण्या

महिला उद्योग क्लस्टर अन् 'मेयर्स कप' क्रीडा स्पर्धेचा प्रस्ताव; केंद्राकडून सहकार्याचे आश्वासन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी महापौर रवी लांडगे यांचा दिल्ली दौरा ठरला ऐतिहासिक! रेड झोनमुक्ती, ८ पदरी महामार्ग ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत केंद्रासमोर मांडला भव्य रोडमॅप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, वेगवान आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देण्यासाठी महापौर रवी लांडगे यांचा दिल्ली दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. देशाच्या राजधानीत विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन महापौरांनी शहराचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले गंभीर प्रश्न थेट केंद्र सरकारसमोर मांडत पिंपरी-चिंचवडच्या उज्ज्वल भविष्याचा व्यापक ‘रोडमॅप’ सादर केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील लाखो नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या ‘रेड झोन’चा प्रश्न महापौरांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडला. संरक्षण विभागाच्या निर्बंधांमुळे नागरिकांना बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, मालमत्ता व्यवहार आणि बँक कर्जांमध्ये येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती देण्यात आली. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, संरक्षण प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच महापौरांनी संरक्षण मंत्र्यांना प्रत्यक्ष शहराला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.  पुणे-नाशिक महामार्ग (NH-60) प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून महामार्गाच्या ८ पदरीकरणाच्या कामास गती देण्याची मागणी.भोसरी येथील ऐतिहासिक राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास कायम ठेवावा. मुंबई-बंगळुरू महामार्ग या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी.

केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबतच्या बैठकीत शहरात “मेयर्स कप” ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापौरांनी मांडला. शहरासाठी सर्वसमावेशक क्रीडा धोरण आखण्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन मिळावे. ‘खेलो इंडिया’ (Khelo India) आणि ‘फिट इंडिया’ (Fit India) अभियानांतर्गत आर्थिक व तांत्रिक सहकार्य मिळवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा संकल्प महापौरांनी व्यक्त केला.

केंद्रीय एमएसएमई (MSME) मंत्री जीतनराम मांझी यांचे प्रमुख सल्लागार संदीप पोखरकर यांच्याशी महापौरांची विशेष चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ‘महिला औद्योगिक क्लस्टर’ उभारून महिलांना उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध करून देणे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष निधी, आधुनिक प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून स्थानिक तरुण-तरुणींसाठी रोजगाराचे दालन उघडणे.

“पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा विषय केंद्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी आहे. दिल्लीतील सर्व बैठकींमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी आमच्या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या असून लवकरच अनुकूल निर्णय होतील. शहराच्या हितासाठी माझा हा लढा आणि पाठपुरावा अधिक ताकदीने सुरू राहील.”

— रवी लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!