सार्वजनिक स्वच्छतागृह अधिक सुलभ अन् सुरक्षित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार! ‘स्वच्छतागृह धोरणा’साठी विविध समाजघटकांशी केंद्रित गटचर्चा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: शहरातील सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहे अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. या धोरणात नागरिकांच्या प्रत्यक्ष अपेक्षा आणि अनुभवांचा समावेश करण्यासाठी निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींसोबत विशेष केंद्रित गटचर्चेचे (Focus Group Discussion) आयोजन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांसाठी हे स्वतंत्र धोरण आखले जात आहे. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत धोरणाचा मसुदा तयार केला जात असून, नागरिकांच्या सूचनांना यात सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. या गटचर्चेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, निवासी कल्याण संघटनांचे (RWA) प्रतिनिधी, तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
चर्चेदरम्यान स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, अखंड पाणीपुरवठा, पुरेशी प्रकाशयोजना, वेळेवर दुरुस्ती आणि सुरक्षित वातावरणासोबतच प्रमुख मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी सुलभ, आधुनिक व व्हीलचेअर-फ्रेंडली रचना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित बनावट, तृतीयपंथी समाजासाठी सन्मानपूर्वक आणि स्वतंत्र सुविधा, स्वच्छतागृहांच्या प्रभावी व्यवस्थापन आणि देखभालीत स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे.
“आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी नागरिक आणि निवासी संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या थेट सूचना या धोरणाला अधिक सर्वसमावेशक आणि नागरिकाभिमुख बनविण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील.”
— डॉ. प्रदीप ठेंगल (उपआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)
या चर्चासत्रात उपआयुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, महेश आढाव, शांताराम माने, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, उपअभियांता वंदना मोरे, अभिजित गनबोटे यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तन्मय गौंड यांनी केले, तर उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागरिकांच्या सहभागातून तयार होणारे हे धोरण शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


