24
समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नांदेडच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा
नांदेड, प्रतिनिधी दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
नांदेड: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम आणि आगामी वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. संघरत्न गायकवाड यांनी नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक वाढ आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा राज्य कार्यकारिणीसमोर मांडला.
नांदेड जिल्ह्यातील कामकाजाची माहिती देताना अॅड. संघरत्न गायकवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात प्रभागनिहाय कार्यकारिण्यांची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे. नांदेड शहरासाठी स्वतंत्र कार्यकारिणी तसेच मध्यवर्ती कार्यालयीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे, ज्यामुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. शहरात व्यापक पातळीवर वृक्षारोपण करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नियमित अन्नदान करण्यात आले. रेशनिंगसंबंधी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुरवठा विभागाशी समन्वय साधून पात्र नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळावे, अशी मागणी अॅड. गायकवाड यांनी ना. छगनराव भुजबळ यांच्याकडे केली. यासंदर्भात नांदेडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती त्यांनी केली.
या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, अॅड. राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे, अॅड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ. नागेश गवळी, डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, मंजिरी धाडगे, माया इरतकर, प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रविंद्र खरात आणि अॅड. सुभाष राऊत यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

