88
पिंपरी-चिंचवड: प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात मनसेचा हल्लाबोल; दूषित पाणीपुरवठा थांबवून त्वरित शुद्ध पाणी देण्याची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील शरदनगर, गल्ली क्रमांक ४ येथील रहिवासी गेल्या आठ दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते नितीन चव्हाण यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शरदनगर गल्ली नंबर ४ मध्ये गेल्या आठ दिवसांपासून नळांना अत्यंत घाण, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास घातक ठरेल असे पाणी येत आहे.
दूषित पाणी येत असल्याने परिसरातील नागरिकांना, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी वणवण भटकावे लागत आहे.
अस्वच्छ पाणी वापरावे लागत असल्याने परिसरात बालके आणि ज्येष्ठांना पोटाचे आजार तसेच साथीचे आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे समस्येवर अद्याप तोडगा निघालेला नाही.
नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचे पाहून मनसे नेते नितीन चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
“पिंपरी-चिंचवडमधील करदात्या नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे ही महापालिकेची प्राथमिक आणि नैतिक जबाबदारी आहे. शरदनगर भागात आठ-आठ दिवस दूषित पाणी पुरवून महापालिका नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “पाणीपुरवठा विभागाने तात्काळ या समस्येचे निवारण करून शरदनगर परिसरात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा महापालिकेच्या ढिम्म कारभाराविरोधात मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
