20
गौरी-गणपतीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक फुलांचा सुळसुळाट; महापालिकेचा पर्यावरण विभाग झोपेत?
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: गौरी-गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पिंपरी-चिंचवड शहरात प्लास्टिकच्या फुलांचा आणि पर्यावरणास घातक सजावटीच्या साहित्याचा मोठा सुळसुळाट झाला आहे. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा नियम लागू केला असतानाही शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या माळा, तोरणे व कृत्रिम फुलांची उघडपणे विक्री सुरू आहे. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर आणि विशेषतः पर्यावरण विभागाच्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बाजारातील प्लास्टिक आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या साहित्यावर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी महापालिकेच्या पर्यावरण विभागाची आहे. मात्र, मोशी येथील दुर्घटनेनंतर पालिकेचा पर्यावरण विभाग पूर्णपणे कोलमडला असून तो अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पर्यावरण विभागात सातत्याने अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने हा विभाग अद्याप रुळावर आलेला नाही.बंदीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाकडून प्रत्यक्षात बाजारात कोणतीही तपासणी केली जात नाही. सणासुदीच्या काळात परराज्यातून आलेल्या विक्रेत्यांनी शहरात दुकाने थाटली तरीही पर्यावरण विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.
स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारी असल्याने ग्राहक प्लास्टिकच्या फुलांकडे आकर्षित होत आहेत. मात्र, यामुळे स्थानिक शेतकरी, पारंपरिक फूल उत्पादक आणि स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर पाय आला आहे. सणासुदीच्या दिवसांतही नैसर्गिक फुलांची मागणी घटल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
तसेच, प्लास्टिकच्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने शहरात दीर्घकाळ नष्ट न होणाऱ्या कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण होणार असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या या गलथान कारभारावर आता नागरिकांमधून प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार की नाही? ढिम्म आणि निष्क्रीय झालेल्या पर्यावरण विभागावर महापालिका काय कारवाई करणार? सणापूर्वी शहरातील प्लास्टिक फुलांचे गोडाऊन आणि दुकानांवर धडक कारवाई करून साठा जप्त केला जाणार का?
पर्यावरण रक्षणाचा केवळ कागदी दिखावा न करता महापालिकेने तातडीने विशेष पथके स्थापन करून नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर व साठा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
