29
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी दुर्घटना: चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (NICU) अचानक लागलेल्या आगीत ३ नवजात बालकांचा मृत्युमुखी पडल्याची अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून येत्या आठ दिवसांत ही समिती आपला तपास अहवाल सादर करेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अमरावती येथे पोहचून दुर्घटनाग्रस्त एनआयसीयू (NICU) विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी आमदार सुलभा खोडके, महापौर चंद तेजवानी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले, “दोन वर्षांपूर्वीच या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून तेथे अद्ययावत सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशी दुर्दैवी घटना घडणे अत्यंत गंभीर आहे. या घटनेचे मूळ कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.”
या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, ‘एम्स’चे (AIIMS) वरिष्ठ अधिकारी, तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. व्हेंटिलेटर, विद्युत यंत्रणेतील दोष, शॉर्ट सर्किट, फायर ऑडिट आणि इतर प्रशासकीय अनियमिततांची ही समिती सखोल तपासणी करेल. ८ दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही.

या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या बालकांच्या पालकांना शासनातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली. तसेच आगीत जखमी झालेल्या इतर नवजात बालकांवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील. आरोग्यमंत्र्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमधील फायर ऑडिट (Fire Audit) नियमानुसार आणि नियमित होण्यासाठी मुंबईत सह्याद्री किंवा मंत्रालयात संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावण्यात येईल. या बैठकीत सर्व रुग्णालयांना कडक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

