news
Home पिंपरी चिंचवड पर्यावरण रक्षण ते कुटुंबव्यवस्था; सांगवीतील सद्भावना बैठकीत ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर विशेष भर!

पर्यावरण रक्षण ते कुटुंबव्यवस्था; सांगवीतील सद्भावना बैठकीत ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर विशेष भर!

ह.भ.प. राजाराम नामदेव कड महाराज आणि दिलीप कंद यांचे मार्गदर्शन; सांगवीत सामाजिक बांधिलकीचा नवा संदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सांगवी येथे सामाजिक सद्भावना बैठक संपन्न; विविध क्षेत्रांतील १५० प्रतिनिधींचा सहभाग

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी सुनील मधुकर पोकरे, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज :

जुनी सांगवी: देशातील हिंदू समाजातील सर्व घटकांमध्ये परस्पर संवाद, एकता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने जुनी सांगवी येथील बालाजी लॉन्स येथे ‘सामाजिक सद्भावना’ बैठकीचे भव्य आयोजन करण्यात आले. या बैठकीस सांगवी परिसरातील ग्रामस्थ, नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध धर्म, पंथ व जातींचे सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. किशोर गिते यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी सामूहिक गीताने झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे ह.भ.प. राजाराम नामदेव कड महाराज, श्री. दिलीप दत्तात्रय कंद आणि श्री. निलेश यशवंत कावळे यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सामाजिक सद्भावना कार्याचे संयोजक ह.भ.प. राजाराम नामदेव कड महाराज यांनी सांगितले की, सांगवी गावात सर्व घटकांना एकत्र आणणारा असा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. समाजातील सर्व बांधवांमध्ये सामाजिक बांधिलकी, परस्पर संवाद आणि बंधुभाव वाढवणे हाच या बैठकीचा मुख्य हेतू आहे.
पिंपरी-चिंचवडचे सहकार्यवाह श्री. दिलीप दत्तात्रय कंद यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी विविध जाती आणि घटकांच्या नेतृत्वाने एकत्र येणे गरजेचे आहे. समाजासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपायांवर सामूहिक मंथन करून पुढील वाटचाल निश्चित करणे आवश्यक आहे.
धर्म जागरूकता विभाग (सांगवी) चे सहसंयोजक श्री. निलेश यशवंत कावळे यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले. त्यांनी पर्यावरण रक्षण, नागरी कल्याण, कुटुंबव्यवस्था सुदृढ करणे, शिक्षण आणि रोजगार या पाच प्रमुख विषयांवर समाजात प्रबोधन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या प्रसंगी सामाजिक एकतेचा संदेश देणारा रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम पार पडला. उपस्थितांनी एकमेकांना राख्या बांधून बंधुभाव व सामाजिक समरसतेचा संकल्प सोडला. संतसाहित्य अभ्यासक ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण शंकरराव भागवत यांनीही आपले विचार मांडले. बैठकीच्या सांगतेनंतर उपस्थितांसाठी सात्त्विक भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता बब्रुवाहन वाघ महाराज यांच्या पसायदानाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य जोशी यांनी केले, तर आभार प्रमोद सुतार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर खोत, विशाल सांगळे, अमोल रासकर, निलेश राणे, सचिन खेले, उमेश केदारी, रविकिरण भटाले, जतीन गाजरे, श्रीकृष्ण जोशी, प्रदीप बढे, नरेंद्रसिंग राजपुरोहित, ओंकार शिंदे आणि गणेश ढमढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!