43
पीएमपीएमएलचा मोठा निर्णय: ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५०% सवलत; अपघातातील मृतांच्या वारसांना ३ लाखांची मदत
पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे आणि प्रवाशांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा अत्यंत लोकाभिमुख निर्णय घेण्यात आला.
बैठकीस पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आवाड यांच्यासह संचालक मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस पासमध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व परवडणारा होईल. बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस १ लाख रुपयांपर्यंत, तर दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मालमत्तेच्या नुकसानासाठी शासकीय मूल्यमापनानुसार भरपाई दिली जाईल. पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील सर्व बसेसमध्ये ‘डॅशकॅम‘ बसवले जाणार आहेत. यामुळे अपघातांची किंवा अनुचित घटनांची वस्तुनिष्ठ नोंद ठेवणे सोपे होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रशासकीय नियमांच्या चौकटीत राहून महामंडळातील ३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या पूरक ‘फीडर’ सेवा अधिक सक्षम करणे, नवीन बसेस ताफ्यात आणणे आणि बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात आला.

“ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा आणि अपघातग्रस्तांना ३ लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे प्रवाशांना ठोस सुरक्षाकवच मिळेल. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांना सुरक्षित, वेळेवर आणि सुलभ वाहतूक सेवा मिळावी यासाठी महामंडळाची कार्यक्षमता वाढवण्यावर आमचा भर राहील.”— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता उपलब्ध बस ताफ्याचा प्रभावी वापर, मेट्रो फीडर सेवेचे जाळे आणि बस ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. प्रवासीहिताचे हे सर्व निर्णय धरातलावर प्रभावीपणे राबवले जावेत यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.”— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड मनपा)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

