40
पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट, पारदर्शक व उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (President’s Police Medal – PPM) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १५.०० वाजता मुंबई येथील राजभवन (लोकभवन) मधील दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष पदक अलंकरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते श्री. चौबे यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त (१५ ऑगस्ट २०२३) मा. राष्ट्रपती महोदयांनी श्री. विनय कुमार चौबे यांच्या प्रदीर्घ, सेवाभावी आणि शिस्तबद्ध प्रशासकीय कारकीर्दीची दखल घेत या पदकाची घोषणा केली होती.
भारतीय पोलीस सेवेतील (IPS) एक अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळताना अनेक आधुनिक व जनहितैषी उपक्रम राबवले.औद्योगिक व आयटी नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात संघटित गुन्हेगारी, मटका-जुगार, आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ व ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर कारवाई करत त्यांनी गुन्हेगारीवर मोठा वचक निर्माण केला. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे, महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ बळकटीकरण, आणि पोलीस ठाण्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही व ‘बीट मार्शल’ उपक्रमात सुधारणा केल्या. सामान्य नागरिकांना सहज न्याय मिळावा यासाठी पोलीस आयुक्तालयात थेट तक्रार निवारण शिबिरे आणि ‘ऑटो रिक्षा युनिक आयडी’ यांसारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.
श्री. विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सर्वोच्च सन्मान त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित कर्तव्यनिष्ठेची पावती असून, यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची मान उंचावली आहे. या सन्मानाबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवडकरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

