23
अमरावतीतील शासकीय बालगृहातील तीन अल्पवयीन मुलींच्या कुटुंबाचा शोध सुरू; पोलिसांचे नागरिकांना मदतीचे आवाहन!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: येथील शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल झालेल्या मोना, अनामिका आणि सोनी अकील यादव या तीन अल्पवयीन बालिकांना भेटण्यासाठी आजतागायत त्यांचे आई-वडील अथवा नातेवाईक आलेले नाहीत. या बालकांचे पुनर्वसन आणि कौटुंबिक पुनर्भेट घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला जात असल्याची माहिती बालगृहाच्या अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार या तिन्ही बालिका निरनिराळ्या कालावधीत अमरावती येथील शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल झाल्या आहेत.
१. मोना (वय अंदाजे १६ ते १८ वर्षे) १२ ऑगस्ट २०२६ रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथकाला ती नांदगाव पेठ जवळील एका मंदिरात आढळून आली होती. वय १६ ते १८ वर्षे, उंची १४४ सेमी, वजन ३६ किलो आणि वर्ण सावळा.
२. अनामिका (वय अंदाजे १२ ते १६ वर्षे)४ सप्टेंबर २०२५ रोजी भातकुली पोलीस स्टेशनमार्फत तिला बालगृहात दाखल करण्यात आले. ही बालिका माईल्ड मतिमंद असून केवळ मोजके हिंदी शब्द बोलते. वजन १५ किलो, उंची १३५ सेमी, वर्ण सावळा. सध्या या बालिकेला मोझरी येथील मतिमंदांच्या शाळेत दाखल करण्यात आले असून भातकुली पोलिसांमार्फत तिच्या पालकांचा शोध सुरू आहे.
३. सोनी अकील यादव १४ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती रेल्वे पोलिसांमार्फत तिला बालगृहात आणले गेले. जबलपूर रेल्वेमध्ये एकटी भटकताना ती पोलिसांना सापडली होती. वडिलांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचे आणि आई सोडून गेल्याचे सोनी सांगते. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचे मूळ गाव कुडीयागाव वस्का बाजार (जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असून जवळचे पोलीस स्टेशन ‘इटावा’ आहे. बालिकेला २९ सप्टेंबर २०२४ रोजी मरीयमपूर येथे आणि त्यानंतर १५ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथील होली क्रॉस बाल शिक्षण केंद्रातून ती न सांगता निघून गेली होती. पुढे नागपूर पोलिसांना आढळल्यानंतर तिला पुन्हा शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.
संबंधित तीन बालिकांचे आई-वडील, नातेवाईक किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती असणाऱ्या नागरिकांनी अथवा सामाजिक संस्थांनी अमरावती येथील शासकीय मुलींचे बालगृह किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन बालगृह प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
