12
शासकीय आश्रमशाळांमध्ये २,४२१ शिक्षकांची मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलद्वारे १००% पदे भरणार!
अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगाभरतीमुळे राज्यातील डी.एल.एड. आणि बी.एड. धारक पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत प्रवेशाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही विभागांतील आश्रमशाळांचा या भरतीत समावेश आहे. नाशिक विभाग ८२६ पदे, ठाणे विभाग ६१३ पदे, नागपूर विभाग ५१४ पदे, अमरावती विभाग ४६८ पदे
भरती प्रक्रियेत स्थानिक व आदिवासी भागातील उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे:
| शिक्षकाचा प्रकार | नॉन-पेसा पदे | पेसा पदे | एकूण पदे |
| प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | ८६२ | ४३६ | १,२९८ |
| प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | १६१ | ६७ | २२८ |
| माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) | ३५२ | १३८ | ४९० |
| माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | २२ | ५ | २७ |
| उच्च माध्यमिक शिक्षक (सर्व विषय) | १०६ | २५१ | ३५७ |
| एकूण | १,५३६ | ८८५ | २,४२१ |
(टीप: उच्च माध्यमिक शिक्षकांमध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे.)
ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ (PAVITRA) प्रणालीद्वारे अत्यंत पारदर्शकपणे, गुणवत्तेच्या आधारावर आणि शासनाच्या नियमांनुसारच राबवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने मध्यस्थ किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
