18
अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला दिली वेगळी उंची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
नागपूर, प्रतिनिधी दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
नागपूर: मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. सर्वसामान्यांच्या या भावभावनांना आपल्या अनोख्या अभिनयातून हास्याची अन् आनंदाची किनार देत, मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची मिळवून देण्याचे महान कार्य अशोक सराफ यांनी केले आहे, असे गौरवद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते ‘महाराष्ट्र भूषण’ पद्मश्री अशोक सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून सत्कार करण्यात आला. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे डॉ. गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह व ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ८० दिव्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलाकृतींनी अनेक पिढ्यांना हसवले आणि मराठी सिनेमाची गोडी लावली. हा सत्कार म्हणजे नागपूरकरांच्या वतीने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.”
सत्काराला उत्तर देताना भावूक झालेल्या अशोक सराफ यांनी, “आजवर इतका भव्य सत्कार माझा कधीही झाला नव्हता. प्रेक्षक आहेत म्हणूनच आज आम्ही कलाकार म्हणून उभे आहोत,” अशा शब्दांत प्रेक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक माजी आमदार संदीप जोशी यांनी केले, तर महापौर नीता ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
