2
‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त रंगली मराठी लोककला, बालरंगभूमी आणि संगीताची सुरेल मैफल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, लोककला, संगीत आणि रंगभूमीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य पर्वणी रसिकांना लाभली. लावणीचा ठसका, बालनाट्याची मौज, कवयित्री शांता शेळके यांच्या रचनांवर आधारित ‘स्वरशांता’ संगीत सभा आणि शाहिरी पोवाड्यांच्या खणखणीत आवाजाने पिंपरी-चिंचवड नगरी दुमदुमून गेली.
सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात महिलांसाठी खास लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गण, मुजरा व गवळणीने झाली. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माया खुटेगांवकर यांनी ‘विचार काय हाय तुमचा ओ पाव्हणं’, तर दोन बालगंधर्व व विठाबाई भाऊमांग पुरस्कारप्राप्त अर्चना जावळेकर यांनी ‘या रावजी बसा भावजी’ या लावणीद्वारे उपस्थितांना भुरळ घातली. नमिता पाटील (‘पाटलांचा लय रुबाब’), प्राची मुंबईकर (‘कुण्या गावचं आलं पाखरू’), पूजा विडकर व अस्मिता पुणेकर (‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’) आणि गायक स्वप्नील गायकवाड (‘पाटलांचा बैलगाडा’) यांच्या सादरीकरणाने महिला रसिकांनाही नृत्याचा ठेका धरायला लावला. कार्यक्रमाचे नियोजन समीर सूर्यवंशी, स्मिता देशमुख व वैजयंती भालेराव यांनी सांभाळले, तर राम दत्तकला यांनी सूत्रसंचालन केले.
आचार्य अत्रे रंगमंच येथे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कादंबरी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ग्रीझी अस्वल आणि चिंटू या पात्रांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच मराठी बालरंगभूमीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. गेल्या ४ दशकांत साडेतीन हजारांहून अधिक प्रयोग सादर करणाऱ्या कादंबरी संस्थेचे प्रमुख प्रा. नितीन कुमार यांनी मोबाईलच्या युगात मुलांचे हरवलेले बालपण पुन्हा जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात कवयित्री शांता शेळके यांच्या अजरामर रचनांवर आधारित ‘स्वरशांता’ हा संगीत कार्यक्रम रंगला. मंजुश्री दिवाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या शिष्यांनी ‘गणराज रंगी नाचतो’, ‘ऋतू हिरवा’, ‘घनराणी’, ‘हे श्याम सुंदर’, ‘माजे राणी माजे मोगा’, आणि ‘काटा रुते कुणाला’ यांसारखी अजरामर भावगीते, कोळीगीते व नाट्यगीते सादर केली. शुभदा दामले व विशाखा कुलकर्णी यांनी ओघवते सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सहकार्याने आयोजित शाहिरी कार्यक्रमात १५ पारंपरिक व स्फूर्तीदायक रचना सादर करण्यात आल्या. छत्रपती शिवरायांचा स्वराज्य इतिहास, वीर बाजीप्रभूंचा पराक्रम, अण्णाभाऊ साठेंची ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ही लावणी आणि संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ शाहिरांनी खणखणीत आवाजात सादर केला.
शाहीर प्रकाश ढवळे, बाळासाहेब माळुसकर, चैतन्य आजरुडकर, रामरत्न पाडगळ, अभिजित काळोखे, मनिषा मोहिते, स्मिता बोरीवकर यांच्यासह बाळशाहीर अथर्व गायकवाड याच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा आणि लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा प्रत्यक्ष अनुभवता आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
