23
‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते, सुप्रसिद्ध रंगकर्मी आणि पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) गोवा येथे दुःखद निधन झाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उपक्रमादरम्यान नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालिकेचे अधिकारी, कलाकार आणि नागरिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रसिद्ध गझलगायक आशिष मुजुमदार, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल राजू मोहन, प्रवीण चाबुकस्वार, वर्षा जाधव, निदेशक रवींद्र ओव्हाळ, योगिता कोठावदे, बबिता गावंडे, व्ही. आर. कुंभार आणि शिक्षक गणेश लिंगडे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी नाना पाटेकर यांच्या अभिनयातील अफाट कौशल्याच्या आठवणींना उजाळा देत मराठी व हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानाला उजाळा दिला.
मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या नाना पाटेकर यांनी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीत स्वतःचा स्वतंत्र व प्रभावशाली ठसा उमटवला. कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कसदार संवादफेकीने आणि अभिनयाने त्यांनी मराठी भाषा जगभरात समृद्ध केली. एक संवेदनशील कलाकार म्हणून त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठी आर्थिक मदत देऊन सामाजिक भान जपले.
महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राच्या जाण्याने संपूर्ण कलासृष्टीचे आणि महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
