news
Home पिंपरी चिंचवड ‘तणावमुक्तीसाठी हवे सुरक्षित अन् मोकळे वातावरण’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात तज्ज्ञांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला!

‘तणावमुक्तीसाठी हवे सुरक्षित अन् मोकळे वातावरण’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात तज्ज्ञांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला!

पीसीयू, 'राहत क्लिनिक' व 'लायन्स क्लब'चा संयुक्त उपक्रम; व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व मानसिक स्वास्थ्यावर सविस्तर मार्गदर्शन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहावे; संवादाची सुरुवात करणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत संवेदनशील आणि भक्कम आधार देणारे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जीवनातील कठीण प्रसंगांत आपले म्हणणे समजून घेणारी, ऐकून घेणारी आणि पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती हवी असते. मानवी संवेदना आणि योग्य वेळी मिळणारा आधार हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आणि समाजाने मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे आणि गरज असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे केला पाहिजे,” असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU), स्कूल ऑफ सायन्सेसच्या ‘राहत डायट अँड वेलनेस क्लिनिक’ आणि ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी “आत्महत्यांबाबतची मानसिकता बदलू या : संवादाची सुरुवात करू या” या विषयावर आयोजित चर्चासत्रात कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे बोलत होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पीसीयूचे कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी यांनी सांगितले की, व्यसनाधीनतेचा थेट परिणाम मानवी मानसिक आरोग्यावर होतो, त्यामुळे या विषयावर समाजात व्यापक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, समजूतदार, आधार देणारे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण मिळाल्यास अनेक मानसिक समस्या सुटू शकतात.
तसेच प्रा. सौरभ चव्हाण यांनी भावनिक तणावात असलेल्या व्यक्तींमधील प्राथमिक लक्षणे ओळखणे, त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधणे, भावनिक नियंत्रणाचे महत्त्व पटवून देणे आणि वेळेत मानसोपचार तज्ज्ञांची मदत मिळवून देणे किती गरजेचे आहे, यावर सविस्तर प्रकाश टाकला.

या प्रसंगी कॉलेज ऑफ सायन्सेसच्या अधिष्ठाता प्रा. रुचू कुठियाला, लायन्स क्लबचे रीजन चेअरपर्सन सलीम शिकलगार, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ सानिध्या मिसाळ, डॉ. जुई पुजारी, लायन्स क्लबच्या जिल्हा अध्यक्ष रश्मी नायर, पुणे अध्यक्ष संदेश मुखेडकर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राच्या माध्यमातून मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!