23
ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचा महापालिका सभेत गौरवपूर्ण सत्कार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: कामगार चळवळ, सामाजिक-राजकीय क्षेत्र आणि मराठी साहित्यविश्वात आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मोशी येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात कामगार नेते तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांचा आज महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते भावूक व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक म्हणून आणि पुणे जिल्हा वीज वितरण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी शहराच्या विकासात व नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक जडणघडणीत कामगार चळवळीला दिशा देण्याचे काम अरुण बोऱ्हाडे यांनी केले. ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’ (HA) कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व सांभाळले. सन २००३ मधील ऐतिहासिक एच.ए. कंपनीतील कामगार आंदोलन, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का तसेच चाकण औद्योगिक पट्ट्यातील कामगारांच्या विविध लढ्यांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. ‘श्रमिक एकता महासंघा’च्या माध्यमातून त्यांनी शहरातील कामगारांना संघटित करून त्यांचे न्याय्य हक्क मिळवून दिले.
कामगार चळवळीसोबतच मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना करून त्यांनी ग्रामीण व नागरी भागातील नवोदित साहित्यिकांना, कवींना व लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या समृद्ध सामाजिक व साहित्यिक प्रवासावर ‘अरुणगंध’ हा विशेष गौरवग्रंथही प्रकाशित झालेला आहे.
या दिमाखदार सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आर.पी.आय. नेते कुणाल वाव्हळकर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, ‘क’ प्रभाग समिती अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, ‘ई’ प्रभाग समिती अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, निलेश नेवाळे, नगरसेविका सारिका गायकवाड, सारिका सस्ते यांच्यासह अनेक नगरसदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी अरुण बोऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
