34
माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांना पिंपरी-चिंचवड मनपा तर्फे जयंतीनिमित्त अभिवादन; ‘सद्भावना दिना’निमित्त घेतली सामूहिक शपथ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. तसेच या दिनाचे औचित्य साधून सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देणारी ‘सामूहिक सद्भावना शपथ’ पालिका मुख्यालयात घेण्यात आली. या प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
या अभिवादन कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांतील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सद्भावना दिना’ची सामूहिक शपथ घेतली. या शपथेद्वारे देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचा संकल्प करण्यात आला. सर्व धर्म, भाषा, प्रदेश आणि समुदायांमध्ये परस्पर आदर व सद्भावना वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली. परस्परांमधील सर्व प्रकारचे राजकीय वा सामाजिक मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता, केवळ विचार-विनिमय आणि सांविधानिक (घटनात्मक) मार्गाने सोडविण्याची शपथ घेण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

