3
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापले; ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांकडून ३० कडक अटींसह मंजुरी!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आगामी २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष शैक्षणिक व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी अखेर ३० कडक अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. पुण्यातील ऐतिहासिक एसएसपीएमएस (SSPMS) मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला असून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुण्यात अचानक लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांवरून काँग्रेस पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाला भारतीय जनता पक्ष (BJP) घाबरला आहे; म्हणूनच हा कार्यक्रम मोडीत काढण्यासाठी प्रशासकीय निर्बंधांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
दुसरीकडे, विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावत भाजपने कडक प्रत्युत्तर दिले आहे. आगामी सण-उत्सव आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या नियमांनुसार योग्य ती कारवाई करत असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या राजकीय संघर्षामुळे पुण्यामध्ये सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील वाद अधिक तीव्र झाला आहे.
‘नीट’ (NEET) परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटी प्रकरणे, भरमसाठ वाढलेली शैक्षणिक फी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांवर तरुणांमधील रोष समजून घेण्यासाठी राहुल गांधी देशभरात संवाद दौरा करत आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमात ते विशेषतः विद्यार्थिनींशी आणि तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम परिसरात ड्रोनद्वारे छायाचित्रीकरण आणि फोटोग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई, मुख्य स्टेजभोवती ‘डी-कॉर्डन’ (D-Cordon) देऊन व्यासपीठ सुरक्षित ठेवणे आणि पीडब्ल्यूडीचे (PWD) फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य, कार्यक्रमात कोणतेही प्रक्षोभक, आक्षेपार्ह पोस्टर्स, बॅनर्स किंवा धार्मिक भावना दुखावणारे साहित्य वापरण्यास मनाई, संपूर्ण मैदान परिसरात २४ तास सुरू असणारे सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला उपस्थितांसाठी स्वतंत्र सुरक्षा व तपासणी कक्ष अनिवार्य, सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करणे आणि वाहतूक व अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणे बंधनकारक, कायद्याचे उल्लंघन झाल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही परवानगी तातडीने रद्द करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
