1
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रात रंगले प्रात्यक्षिक; रायका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे धडे!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पिंपळे सौदागर येथील ‘रायका स्कूल’च्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथे अग्निसुरक्षा जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेचे उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान लीडिंग फायरमन नामदेव वाघे यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाची कार्यपद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकाकडून केली जाणारी कारवाई याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आपदा मित्र संतोष शेलार, अफसाना पठाण आणि गीतेश बांगरे यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन वाहनांची पाहणी घडवून आणत वाहनातील विविध उपकरणे, अग्निशमन साहित्य व बचाव साधनांची प्रत्यक्ष माहिती आणि प्रात्यक्षिके दाखवली.

यावेळी विद्यार्थ्यांना आगीच्या वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान कसे राखावे, सुरक्षित स्थळी कसे पोहोचावे, धुरापासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि आपत्कालीन स्थितीत त्वरित काय पावले उचलावीत, याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही ठिकाणी आग लागल्यास तात्काळ अग्निशमन विभागाच्या १०१ या टोल-फ्री आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जवानांनी केले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण अग्निशमन केंद्राची पाहणी करत जवानांशी संवाद साधला. अग्निशमन वाहने व उपकरणांविषयी त्यांनी अत्यंत उत्सुकतेने प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
लहान वयातच अग्निसुरक्षेबाबत योग्य माहिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची जाणीव निर्माण झाल्यास, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी अधिक सजगपणे आणि जबाबदारीने वागू शकतात, या उद्देशाने महापालिकेकडून शाळांमध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत. रायका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अग्निसुरक्षेचे महत्त्व समजून घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
