2
पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी; सभापती अभिषेक बारणे यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या विकासाला नवी गती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित ठेवण्याच्या ठाम भूमिकेतून महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वपूर्ण विकासात्मक प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या सक्षम आणि अभ्यासू अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. शहराचा विकास केवळ नवीन प्रकल्पांपुरता मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या गरजा आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करण्यावर सभापती बारणे यांनी दिलेल्या भरामुळे प्रशासकीय वर्गासह शहरवासीयांतून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.
सभेच्या प्रारंभी मनपाच्या शहर अभियंता पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीया यांचा सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

युवकांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी जपानी आणि जर्मन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
एका वर्षाच्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषा प्रशिक्षण व परीक्षांचे मोफत मार्गदर्शन, आवश्यक पुस्तके, अभ्यास साहित्य व अधिकृत प्रमाणपत्र, भारत तसेच परदेशात थेट प्लेसमेंट सपोर्ट (नोकरीची संधी), स्वयंरोजगार, स्टार्टअप आणि शासकीय योजनांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमामुळे स्थानिक तरुण-तरुणींना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची दारे उघडी होणार आहेत.
निगडी सेक्टर २३ आणि चिखली टप्पा क्र. १ जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक ‘पावडर पॉली इलेक्ट्रोलाईट’ आणि स्टेबल ब्लिचिंग पावडर खरेदीस मंजुरी. अजमेरा, मोरवाडी, मासुळकर कॉलनी, दापोडी आणि सांगवी परिसरातील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रीय साफसफाई व देखभाल दुरुस्तीची कामे मंजूर. वायसीएम (YCM) आणि थेरगाव रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या केंद्रांमार्फत पात्र रुग्णांच्या मोफत एमआरआय (MRI) तपासण्यांच्या बिलांची अदायगी नियमित करण्यास मंजुरी. तसेच रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी Non-Chlorinated पिशव्यांची उपलब्धता. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्ता, पुणे-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉर, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक या प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरण व पॅचवर्क दुरुस्तीच्या कामांना हिरवा कंदील. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित १६ व्या ज्युनिअर महिला नॅशनल हॉकी स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा पुरवणे, अण्णाभाऊ साठे जयंती प्रबोधन पर्व आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या खर्चास मंजुरी.
“शुद्ध पाणीपुरवठा, सक्षम रस्ते, सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार आरोग्य सेवा आणि स्वच्छता यांना प्राधान्य देतानाच आपल्या युवकांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकहित, गुणवत्ता आणि कार्यक्षम प्रशासन यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती नेहमीच कटिबद्ध राहील.”— अभिषेक बारणे (सभापती – स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
